पालकांची संमतीपत्र कमी आल्यास शाळा उघडण्याचा पुनर्विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:14 AM2020-12-30T04:14:12+5:302020-12-30T04:14:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची संमतीपत्रे कमी आल्यास, येत्या ४ जानेवारीपासून महापालिकेच्या नववी ते बारावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची संमतीपत्रे कमी आल्यास, येत्या ४ जानेवारीपासून महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पुनर्विचार होऊ शकतो,” असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘कोरोना’चा प्रभाव कमी झाल्याने बहुतांशी क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने यापूर्वीही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. परंतु दहावी व बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश गेल्या आठवड्यात दिले हिते. मात्र यासाठी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र आवश्यक करण्यात आले आहे.
आजमितीस पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी पालकांची संमतीपत्रे अतिशय कमी आले आहेत. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसात पालकांच्या संमतीपत्रांची संख्या विचारात घेऊन आणि कोरोना विषाणुंच्या नव्या प्रकाराचा संसर्ग विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा पुनर्विचार केला जाणार आहे.
चौकट
निम्मे पालकही नाहीत राजी
पुणे महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ८ हजार आहे. यापैकी आजमितीला २ हजार १०० च्या आसपास संमती पत्रे प्राप्त झाली आहेत. म्हणजेच अद्याप निम्म्या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठवण्यास संमती दिलेली नाही.