बांधकाम क्षेत्राला पुन्हा उभारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:38+5:302021-07-16T04:08:38+5:30
सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो. आयुष्यभर केलेल्या नोकरी धंद्यातून मेहनतीचा पैसा त्याने घरासाठी बाजूला ठेवलेला असतो. त्यामुळे आपल्यासह ...
सर्वसामान्य माणूस आयुष्यात एकदाच घर घेतो. आयुष्यभर केलेल्या नोकरी धंद्यातून मेहनतीचा पैसा त्याने घरासाठी बाजूला ठेवलेला असतो. त्यामुळे आपल्यासह आपल्या परिवाराचं भविष्य चांगल्या घरात जावं असं त्याला वाटत असतं. त्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या बहुसंख्य जणांना 'घर घेताना काय काळजी घ्यावी?' असा प्रश्न पडलेला असतो. त्या माणसांच्या किमान गरजा, आर्थिक गुंतवणुकीची तयारी, भविष्यात घराकडून असलेल्या अपेक्षा आम्ही जाणून घेतो.
घर खरेदी करताना त्यामध्ये सर्वसामान्यांची आर्थिकसोबत भावनिक गुंतवणूक देखील झालेली असते. त्यामुळे योग्य ती मालमत्ता योग्य प्रक्रियेतून विकत घेण्याचा सल्ला आम्ही आवर्जून देतो. यामुळे भविष्यात कायदेशीर बाबींचा घोळ होऊन होणारा मनस्ताप टाळता येतो.
ज्या ठिकाणी घर घ्यायचे आहे त्या प्रकल्पाची पूर्ण माहिती तुम्हाला असणे महत्त्वाचे आहे. घर घेताना तुम्हाला केवळ घराचीच किंमत द्यावी लागत नाही हे लक्षात ठेवा. त्यानुसार तुमचे आर्थिक नियोजन करा. कारण वकिलाचे शुल्क, स्टँप डय़ूटी, रजिस्ट्रेशन फी, गृहविम्याचे प्रीमियम्स आणि मालमत्ता कर या तशा थेट न दिसणाऱ्या बाबी आहेत. अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष खर्चाचा अंदाज तुम्हाला आधीच असणे गरजेचे आहे.
यानंतर सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे घराचे अॅग्रीमेंट. घराचा करारनामा हा सोप्या, सुटसुटीत आणि समजेल अशा भाषेत असावे याची खात्री तुम्ही करुन घ्यायला हवी. तसेच घर घेणाऱ्याने हा करारनामा नीट, काळजीपूर्वक वाचायला हवा. यातील शब्दांमध्ये आपल्याला अडकवले जात नाही ना? याची खात्री करुन घ्यायला हवी. भविष्यात काही अडचणी आल्यास 'ते करारनाम्यात लिहिलं होत', असं ऐकून डोक्यावर हात मारण्याची वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी ही खबरदारी महत्त्वाची आहे. यासोबतच कागदपत्रे आणि ताब्याची प्रमाणपत्रे नक्की सरकार किंवा अधिकृत संस्थांकडून दिली जात आहेत का? याची पडताळणी देखील तुम्हाला करायला हवी.
बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी घर बुकिंग करत असाल तर संबंधित बांधकामाचे वेळापत्रक, गृह प्रकल्प योजना, घर ताब्यात देण्याची तारीख आणि बांधकाम पूर्ण होण्यास उशीर होणार असल्यास बांधकाम व्यावसायिकाकडे काय उपाययोजना आहेत? याची माहिती आधीच करुन घ्या. यामध्ये फसलेल्या ग्राहकांची संख्या मोठी असते. बांधकाम वेळापत्रकानुसार तुम्ही पर्यायी घराची व्यवस्था केलेली असेत. बांधकाम वेळेत न पूर्ण झाल्यास तुमच्यावर विनाकारण आर्थिक संकट ओढावून घेऊ नका.
बांधकाम पूर्ण झालेले घर घेणार असाल तर बांधकाम विक्रेत्याकडे मालमत्तेचे टायटल, पझेशन आणि हस्तांतरणाचे अधिकार आहेत का? याची माहिती करुन घ्या. तसेच मालमत्ता कर, सोसायटी, पाणी आणि विजेची बिले भरली गेली आहेत का? याची माहिती आधीच करून घ्या.
पुणे शहरात आता मेट्रोचे जाळे पसरत असून आंतरराष्ट्रीय विमानतळही येण्याच्या मार्गावर आहे. पुण्यात नव्या गावांचा समावेश झाला असून त्यामुळे पुण्याचा विस्तार वाढल्याचे आपण सर्वजण पाहतोय. अशा वेळी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढल्याने पुण्याच्या लोकसंख्येत भर पडतेय. या सर्व कारणांमुळे कोरोना संपला नसला तरी घरांच्या मागणीत वाढ होताना दिसतेय हे वास्तव आहे. हे पाहता भविष्यात घरांच्या किमती आणखी कमी होतील म्हणून थोडे दिवस थांबू असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आत्ताच गृह प्रकल्पात गुंतवणूक करणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
इंजिनिअर अमित खांबे
बांधकाम व्यावसायिक