ऑस्ट्रेलिया, जपानच्या सहकार्यातून अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:13 AM2021-02-27T04:13:35+5:302021-02-27T04:13:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक ...

Reconstruction of the economy in cooperation with Australia and Japan | ऑस्ट्रेलिया, जपानच्या सहकार्यातून अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी

ऑस्ट्रेलिया, जपानच्या सहकार्यातून अर्थव्यवस्थेची पुनर्बांधणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “आत्मनिर्भर भारत आणि ऑस्ट्रेलिया व जपानसारख्या विश्वासू भागीदार देशांबरोबरचे सहकार्य यातून निर्माण होणारी परस्परपूरक शक्ती जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची ठरेल,” असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.

‘आशिया आर्थिक संवाद -२०२१’च्या पाचव्या फेरीचे उद्घाटन आज भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री सिनेटर मेरिसे पेन यांच्या उपस्थितीत झाले. दोन्ही परराष्ट्रमंत्र्यांनी ‘रेझिलियंट ग्लोबल ग्रोथ इन अ पोस्ट पँडेमिक वर्ल्ड’ या परिसंवादात भाग घेतला. परिसंवादाची सुरुवात जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सू यांच्या ध्वनिमुद्रित संदेशाने झाली. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’चे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि परिषदेचे संयोजक माजी राजदूत गौतम बंबावाले यांनी स्वागत केले. ‘कोविडोत्तर जगातील आंतररराष्ट्रीय व्यापार व वित्त क्षेत्राची समीकरणे’ हा यंदाच्या परिषदेचा विषय आहे.

डॉ. जयशंकर म्हणाले की, “देशादेशांमधील व्यापार हा समान पातळीवरून व्हायला हवा. भारताच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात लहान व मध्यम उद्योग महत्त्वाची भूमिका बजावतील. या क्षेत्राला पाठबळ देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परस्पर सहकार्यातून भविष्य साकारण्याचा विचार भारताने नेहमीच जागतिक पातळीवर मांडला. त्यानुसार सत्तर देशांना भारतातून लस निर्यात करण्यात आली. या यादीत लवकरच आणखी चाळीस देशांचा समावेश करण्यात येणार आहे.’’

ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेन यांनी सांगितले, “मुक्त व्यापारातील खुलेपणा, बहुपक्षीय व्यापार धोरणाची उपलब्धता आणि पायाभूत सुविधांच्या पुरवठा साखळीला चालना ही सरकारसमोरची सध्याची आव्हाने आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम मेकॅनिक्स या आधुनिक तंत्रज्ञानातील घटकांचा उपयोग करून घेण्याचा आमचा विचार आहे, जेणेकरून भविष्यात कोरोनासारखी आपत्ती कोसळली तरी अर्थव्यवस्थेला फार हानी पोचणार नाही.” जपानचे परराष्ट्रमंत्री मोटेगी तोशीमित्सु यांनी सांगितले, की गेले ८ महिने जपानने आपली बहुस्तरीय पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भर दिला. ‘हरित आणि डिजिटल अर्थव्यवस्था’ उभारण्यावर लक्ष केंद्रित केले.

Web Title: Reconstruction of the economy in cooperation with Australia and Japan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.