चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना
By admin | Published: October 13, 2016 02:32 AM2016-10-13T02:32:38+5:302016-10-13T02:32:38+5:30
मराठी चित्रपटांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपटांचे परीक्षण करून दर्जा निश्चित करण्याकरिता शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या चित्रपट परीक्षण समितीची
पुणे : मराठी चित्रपटांना अर्थसाहाय्य मंजूर करण्यासाठी चित्रपटांचे परीक्षण करून दर्जा निश्चित करण्याकरिता शासनातर्फे गठीत करण्यात आलेल्या चित्रपट परीक्षण समितीची पुनर्रचना करण्यात आली असून, सदस्यपदी किशोरी शहाणे, स्मिता तांबे आणि शर्वाणी पिल्ले या तीन अभिनेत्रींची नियुक्ती करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या मान्यतेने समितीमध्ये राज्यमंत्री, सचिव आणि संचालक (सांस्कृतिक कार्य), कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ यांच्याबरोबर सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील तीन मान्यवर व्यक्ती/तज्ज्ञ यांची निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते. त्यानुसार समितीच्या सदस्यपदी उषा नाईक आणि सोनाली कुलकर्णी यांची नियुक्ती केली होती.
मात्र, त्यांनी परीक्षणाकरिता उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शविल्याने त्यांची नियुक्ती रद्द करून त्या जागी शहाणे, तांबे आणि पिल्ले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटांना अनुदान देण्याच्या योजनेअंतर्गत जे अर्ज संचालकांना प्राप्त होतात, ते अर्ज या परीक्षण समितीकडे पाठविले जातात.
ही समिती आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेची छाननी करून, तसेच चित्रपटाच्या संहिता व अन्य तांत्रिक बाबी विचारात घेऊन योग्य अशा निर्मात्यांची शिफारस शासनाला करते, समितीच्या शिफारशी प्राप्त झाल्यानंतर शासनाच्या मान्यतेने अनुदानास मंजुरी दिली जाते, असे या समितीच्या कार्याचे स्वरूप आहे. (प्रतिनिधी)