शिवाजी मार्केट पुनर्बांधणीला येणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:32+5:302021-07-18T04:08:32+5:30
लष्कर : कॅम्प भागातील ऐतिहासिक शिवाजी मार्केटच्या पुनर्बांधणीला संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, स्थानिक आमदार आणि विक्रेत्याची बैठक झाली. त्यामध्ये ...
लष्कर : कॅम्प भागातील ऐतिहासिक शिवाजी मार्केटच्या पुनर्बांधणीला संदर्भात कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन, स्थानिक आमदार आणि विक्रेत्याची बैठक झाली. त्यामध्ये मार्केटच्या पुनर्बांधणीसाठी लागणाऱ्या निधीबाबत चर्चा झाली असून महिनाभरात निधी उभा करण्यावर एकमत झाले.
गत महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मार्केटच्या उभारणी संदर्भात बैठक झाली होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे शनिवारी व्यापारी शिष्टमंडळाच्या चार सदस्यांसमवेत बोर्ड प्रशासन, स्थानिक आमदार यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार आजच्या बैठकीला मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार, स्थानिक आमदार सुनील कांबळे, संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक मंजूर शेख व अन्य तीन सदस्य उपस्थितीत होते. यावेळी मार्केट उभारणीसाठी लागणाऱ्या निधी, व परवानग्या संदर्भात विस्तृत चर्चा झाली. या चर्चेदरम्यान मार्केटच्या पुनर्बांधणीकरीता दोन कोटी २५ लाखांचा निधी लागणार असून त्यासंदर्भात चर्चा झाली. त्यातील एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उपलब्ध होणार आहे. तर बोर्ड स्वतः ५० लाख रुपये, तर आमदार कांबळे यांनी आगोदरच २५ लाख रुपये दिले आहेत. आणखी २५ लाख निधी लवकरच देणार असल्याचे आमदार कांबळे यांनी यावेळी सांगितले. राहिलेले २५ लाख रुपये व्यापारी संघटना उभे करणार आहे. त्यात १३.५ लाख रुपये जमा झाले असल्याचे मंजूर शेख यांनी सांगितले व उरलेली रक्कम महिनाभरात उभी केली जाईल, असे आश्वासन बोर्डाला दिले.
दरम्यान, आमदार कांबळे यांनी २२ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग व कॅन्टोन्मेंट बोर्ड यांची बैठक आयोजित करून अन्य अडचणी सोडवण्यात येईल, असे सांगितले.
निधीची उभारणी करणे हा मोठा प्रश्न आहे, ती उभी राहण्यासाठी सर्वच प्रयत्न करीत आहेत, लवकरच याबाबत सर्व कागदपत्रे, परवानग्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू याबाबत बोर्डाच्या अध्यक्ष यांना घेऊन लवकरच पुढच्या महिन्यात बांधणीला सुरू करू.
अमित कुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड