रेकॉर्ड ब्रेक! महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी पावसाची नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 09:29 PM2021-07-26T21:29:57+5:302021-07-26T21:36:20+5:30

हवामान विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो.

Record Break Rain: Record rain in Mahabaleshwar for 125 years; 2100 mm of rainfall in 8 days | रेकॉर्ड ब्रेक! महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी पावसाची नोंद 

रेकॉर्ड ब्रेक! महाबळेश्वरमध्ये सव्वाशे वर्षातला विक्रमी पाऊस; ८ दिवसांत तब्बल २१०० मिमी पावसाची नोंद 

googlenewsNext

विवेक भुसे- 

पुणे : महाबळेश्वर हे पश्चिम महाराष्ट्रातील हिल स्टेशन म्हणून लोकप्रिय असण्याबरोबर पावसासाठी प्रसिद्ध आहे. यंदा २२ व २३ जुलै रोजी एका दिवसात पडलेला पाऊस हा गेल्या सव्वाशे वर्षातील विक्रमी पाऊस ठरला आहे.

२२ जुलै रोजी महाबळेश्वर येथे ४८० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्याच्या दुुसऱ्या दिवशी २३ जुलै रोजी ५९० मिमी पावसाची नोंद झाली होती. यापूर्वी ७ जुलै १९७७ रोजी एकाच दिवशी ४३९.८ मिमी पावसाची विक्रमी नोंद होती. जुलै महिन्यातील २४ तासात पडलेला हा आजवरचा विक्रमी पाऊस होता. यंदा २२ व २३ जुलै रोजी पडलेल्या पावसाने हा विक्रम मोडला आहे.

हवामान विभागाकडे १८९६ पासून पावसाच्या नोंदी आढळून येतात. त्यानुसार जुलै महिन्यात १८९६ मध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक विक्रमी पाऊस ४८६६.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा आतापर्यंत १ जूनपासून महाबळेश्वरमध्ये ४०३० मिमी पावसाची नोंद झाली असून यंदा जून मध्ये १२८९.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर आतापर्यंत जुलै महिन्यात २८४१ मिमी पाऊस झाला आहे.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये जुलै महिन्यात सरासरी २०६४.४ मिमी पाऊस होतो. यंदा गेल्या १९ जुलैपासूनच केवळ ८ दिवसात २१०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पश्चिमीकडील वार्यांचा जोर वाढला. त्यावेळी पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. त्याचा परिणाम होऊन बाष्प घेऊन येणारे ढग महाबळेश्वरच्या डोंगररांगांना धडकून ते वर जात होते. एकाच जागी हे ढग तयार झाल्याने महाबळेश्वरला कमी वेळेत अधिक पाऊस झाला. महाबळेश्वरप्रमाणेच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक ठिकाणी ही परिस्थिती होती. मात्र, त्या ठिकाणी पडलेला पाऊस मोजला गेला नसल्याने त्याची नोंद होऊ शकली नाही. यामुळे कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूर, दरडी कोसळणे अशा घटना घडल्या.
गेल्या १० वर्षात ३१ जुलै २०१४ रोजी २४ तासात ४३२ मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, १६ जुलै २०१८ रोजी २९८ .७ मिमी पावसाची नोंद झाली होती.

यंदा महाबळेश्वरमध्ये २४ तासात पडलेला पाऊस (मिमी)
१९ जुलै 2021 - १००
२० जुलै - ११०
२१ जुलै - १६०
२२ जुलै - ४८०
२३ जुलै - ५९०
२४ जुलै - ३२०
२५ जुलै - १९०
२६ जुलै - १५०

Web Title: Record Break Rain: Record rain in Mahabaleshwar for 125 years; 2100 mm of rainfall in 8 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.