जिल्ह्यात एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक ४७४५ नवीन रुग्ण वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:41+5:302021-03-18T04:12:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि त्यातही कोरोना लसीकरणानंतर नागरिकांमध्ये प्रचंड बेफिकिरपणा आला असून, प्रशासकीय पातळीवर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर आणि त्यातही कोरोना लसीकरणानंतर नागरिकांमध्ये प्रचंड बेफिकिरपणा आला असून, प्रशासकीय पातळीवर देखील दुर्लक्ष झाल्याने बुधवार (दि.१७) रोजी पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरातील रेकॉर्ड ब्रेक म्हणजे तब्बल ४ हजार ७४५ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात यापूर्वी सर्वाधिक रुग्ण ३० सप्टेंबर २०२० रोजी ३९६२ एवढे झाले होते.
पुणे जिल्ह्यात आणि राज्यातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ९ मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर विविध कडक निर्बंध व उपाययोजना करण्यात आल्याने रुग्णसंख्या काही प्रमाणात नियंत्रणात होती. परंतु, गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाटच आली होती. यामुळेच ३० सप्टेंबर रोजी गंभीर रुग्णांची संख्या तब्बल ३ हजार ९६२ जाऊन पोहोचली होती. यामुळेच एकट्या पुणे जिल्ह्यात दिवसाला सुमारे १४२.९३ मे.टन ऑक्सिजन मागणी होती. परंतु ऑक्टोबरनंतर ही संख्या पुन्हा टप्प्याटप्प्याने कमी होत गेली. परंतु गेल्या पंधरा दिवसांतच पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णवाढीचा वेग पहिल्या लाटेपेक्षा दुपट्टीने अधिक असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.