पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे विक्रमी उत्पन्न; डिसेंबरअखेरच दीड हजार कोटींचा टप्पा पार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 08:07 PM2021-12-31T20:07:45+5:302021-12-31T20:08:10+5:30
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीत विक्रमी वाढ झाली असून, या विभागाने डिसेंबरअखेरच १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे
पुणे : कोरोना आपत्तीमध्ये पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनचा काळात महापालिकेच्या बांधकाम विभागाला उत्पन्न प्राप्तीमध्ये मोठा फटका बसला होता. मात्र लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर या आर्थिक वर्षात (सन २०२१-२२) बांधकाम विभागाच्या उत्पन्न वाढीत विक्रमी वाढ झाली असून, या विभागाने डिसेंबरअखेरच १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात मार्च,२०२२ अखेरपर्यंत बांधकाम विभागाला १ हजार १८५ कोटी ६ लाख रूपयांचे महसुल प्राप्तीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात या विभागाने ३१ डिसेंबर,२०२१ पर्यंतच अतिरिक्त ३४२ कोटी रूपयांचे उत्पन्न मिळविले असून, एकूण उद्दिष्टाच्या तुलनेत हे उत्पन्न १२८़९२ टक्के इतके असल्याची माहिती शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.
कोरोनामुळे गतवर्षी बांधकाम विभागाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात कमी झाले होते. मार्च, २०२१ अखेर या विभागाला उद्दिष्टापेक्षा केवळ ५० टक्के उत्पन्न प्राप्ती झाली होती. लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यावर पहिल्या काही महिन्यामध्ये बांधकामाचे प्रस्ताव दाखल होण्यास सुरूवात झाली होती. दरम्यान राज्य सरकारनेही बांधकाम विभागाला चालना मिळावी यासाठी, नोंदणी शुल्कात १ टक्यांनी कपात केली. यामुळे बांधकाम परवान्याच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या प्रीमियम एफएसआयच्या शुल्कात ५० टक्के सवलत दिल्यामुळे शहरातील बांधकामाचे प्रस्ताव वाढले गेले.
सरकारकडून मिळालेली ही सवलत योजना ३१ डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत होती़ परिणामी शेवटच्या महिन्यात सुमारे ४०० कोटींचे उत्पन्न बांधकाम विभागाला मिळाले आहे. गेल्या काही वर्षातील बांधकाम विभागाची ही सर्वोत्तम कामगिरी असून, बांधकाम विभागाला चालणा मिळाल्यामुळे सर्वच क्षेत्रामध्ये तेजीचे वातावरण असून, शहरात घराची खरेदी विक्रीचे प्रमाण वाढले गेले आहे. राज्य सरकारने दिलेल्या सवलतीचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे, बांधकाम विभागात प्रस्ताव दाखल करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. अनेक जण शुक्रवारी सायंकाळपर्यंत आपले प्रस्ताव दाखल करत होते.
''सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात बांधकाम विभागाकडून १ हजार १८५ कोटी रूपयांचे उत्पन्न अपेक्षित ठेवण्यात आले होते. मात्र हे उद्दिष्ट बांधकाम विभागाने डिसेंबरअखेरच पूर्ण केले आहे़ शासनाची सवलत योजना व लॉकडाऊन काळात बंद असलेली बांधकामे पुन्हा सुरू झाल्याने, यावर्षी तीन महिने अगोदर बांधकाम विभागाने १ हजार ५२७ कोटी ७३ लाख रूपयांचा महसुल मिळविला आहे. तो उदिद्ष्टापेक्षा अधिक म्हणजे १२.८९२ टक्के इतका आहे असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले.''