३५ गुंठ्यात दहा टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:08 AM2020-12-27T04:08:23+5:302020-12-27T04:08:23+5:30
--- राजुरी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथील शेतकरी रामदास विश्वनाथ पवार यांनी आपल्या ३५ गुंठे क्षेत्रात १० टन ...
---
राजुरी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर) येथील शेतकरी रामदास विश्वनाथ पवार यांनी आपल्या ३५ गुंठे क्षेत्रात १० टन बटाट्याचे विक्रमी उत्पादन काढले आहे. यामधून त्यांना ९० हजार रुपयांचा नफा झाला आहे. वडगाव कांदळी येथील रामदास पवार यांनी ३५ गुंडे क्षेत्रात ३.५ क्विंटल (७ कट्टे प्रत्येकी पन्नास किलो) बटाटा बियाण्याची लागवड केली होती. पुखराज १६६ या जातीचे बटाटा बियाणे ६ हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणावरून खरेदी केले होते. लागवडीपूर्वी शेणखत व कोंबडी खत या खतांचा वापर केला होता. बटाटा लागवड ही ट्रॅक्टरच्या साह्याने केली. लागवडीवेळी १०.१०.२६ या खतांचा वापर तसेच ठिबकच्या माध्यमातून विद्राव्य खतांची मात्रा वेळोवेळी दिली होती. यावर्षी ढगाळ हवामानामुळे पाच ते सहा फवारण्या घ्याव्या लागल्या होत्या याबाबत त्यांना नीलकंठ भोर व संदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. बटाट्याची काढणी दिनांक ३३ डिसेंबर रोजी केली असून ८३ दिवसांच्या कालावधीत त्यांना २०० पिशव्या(१० टन) उत्पादन मिळाले. बैलांच्या साह्याने बटाट्याची काढणी करून शेताच्या बांधावर व्यापाऱ्याला त्यांनी विक्री केली. १५रुपये प्रति किलो दराने विक्री करून त्यांना १ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामधून त्यांचा ६० हजार रुपये खर्च वजा जाता ९० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.
--
कोट
मी गेली २५ वर्षापासून बटाट्याचे पीक घेत असून यावर्षी प्रतिकूल हवामान राहूनही मला बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळाले आहे. सेंद्रिय खतांचा वापर, योग्य नियोजन, वेळोवेळी औषध फवारणी, यामुळे मला हे उच्चांकी उत्पादन घेणे शक्य झाले आहे. अचानक बाजारभाव कमी झाल्याने मला होणाऱ्या नफ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली.
रामदास पवार,
वडगाव कांदळी बटाटा उत्पादक शेतकरी
--
२६राजुरी बटाट उत्पादन
फोटो ओळी : वडगाव कांदळी (ता.जुन्नर)येथील बटाटयाचे भरघोस उत्पादन घेणारे शेतकरी
Attachments area