महाराष्ट्रात साखरेचे विक्रमी उत्पादन, गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ; देशात अव्वल क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 08:54 AM2024-05-17T08:54:04+5:302024-05-17T08:54:14+5:30

राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे....

Record production of sugar in Maharashtra, up 5 lakh tonnes from last year; Top number in the country | महाराष्ट्रात साखरेचे विक्रमी उत्पादन, गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ; देशात अव्वल क्रमांक

महाराष्ट्रात साखरेचे विक्रमी उत्पादन, गेल्या वर्षापेक्षा ५ लाख टनांची वाढ; देशात अव्वल क्रमांक

पुणे : राज्यातील सर्व २०७ साखर कारखान्यांची धुराडी आता थंडावली असून साखर हंगाम संपला असल्याचे साखर आयुक्तालयाने जाहीर केले आहे. राज्यात आतापर्यंत ११०.१७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा १०.२७ टक्के आला आहे.

सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात २८ लाख टन इतके झाले असून त्या खालोखाल पुणे विभागात २५ लाख टन उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादन ५ लाख टनांनी वाढले आहे. यंदा राज्याने साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

यंदा पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऊस उत्पादनावर विपरीत परिणाम होऊन साखर उत्पादनदेखील कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. साखर हंगामाच्या सुरुवातीला राज्यात केवळ ८८ लाख टन निव्वळ साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे ऊस पिकाला फायदा होऊन त्याचा परिणाम ऊस उत्पादन वाढीत झाला. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने त्याकडे वळवली जाणारी साखर कमी झाली. परिणामी एकूण साखर उत्पादनात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

यंदा राज्यात १०३ सहकारी व १०४ साखर कारखान्यांनी हंगामाला सुरुवात केली होती. हंगामाअखेरीस कोल्हापूर विभागाने उत्पादनात आघाडी घेतली असून विभागात २८.०६ लाख टन इतके उत्पादन झाले असून त्या खालोखाल पुणे विभागात २५.१३ लाख टन उत्पादन झाले आहे. सोलापूर विभागात २०.६५ लाख टन उत्पादन झाले आहे.

राज्यात २०२१-२२ या साखर हंगामात साखरेचे विक्रमी १२७ लाख टन उत्पादन घेतल्यानंतर महाराष्ट्रात २०२२-२३ या हंगामात १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे देशात राज्याचा अव्वल क्रमांक घसरला असून उत्तर प्रदेशने उत्पादनात बाजी मारली होती. मात्र, यंदा ११० लाख टन उत्पादन घेतल्यानंतर यंदा राज्याने साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे.

ईथेनॉल बंदीमुळे साखर उत्पादनासाठी ऊस जादा प्रमाणात उपलब्ध झाला. त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली आहे. येत्या हंगामातील ऊस उत्पादनात अचुकता येण्यासाठी लागवडीबाबतच्या माहितीचे संकलन सुरू आहे. त्यामुळे साखर उत्पादन किती राहील याचा अंदाज लावता येणार आहे. आतापर्यंत ९७ टक्के एफआरपी शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. उर्वरित एफआरपी अदा करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.

कुणाल खेमनार, आयुक्त, साखर

 

Web Title: Record production of sugar in Maharashtra, up 5 lakh tonnes from last year; Top number in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.