VIDEO | तब्बल ९० मिनिटे जीभ लावली नाकाला! कसब्यातील पुणेरी काकांचा विक्रम
By श्रीकिशन काळे | Published: March 20, 2023 04:24 PM2023-03-20T16:24:51+5:302023-03-20T16:29:55+5:30
आता गिनिज बूक ऑफ रेकॉर्डसाठी अर्ज पाठविला...
पुणे : तुम्ही तुमच्या नाकाला जीभ लावू शकता का ? शक्यतो अनेकांना ते जमत नाही. परंतु, ७५ वर्षीय पुणेरी काकांनी चक्क ९० मिनिटे जीभ नाकाला लावण्याचा विक्रम केला आहे. त्यांचे नाव सोपान भूमकर असून, इंडिया गिनिज बूकमध्ये त्यांचे नाव नोंदवले गेले आहे. त्यांनी आता गिनिज बूक ऑफ रेकॉर्डसाठी अर्ज पाठविला आहे. कसबा पेठेत राहणारे हे काका म्हणजे सर्वांसाठी कौतुकाचा विषय ठरले आहेत.
काही दिवसांपूर्वी ‘लोकमत’मध्येच ठाणे येथील एका मुलीने ५ मिनिटे नाकाला जीभ लावल्याची बातमी आली होती. ते वृत्त वाचून या काकांनी आपणही हे करू शकतो, असा निर्धार केला. त्यानंतर त्यांनी चक्क ५ मिनिटांपेक्षा अधिक आपण नाकाला जीभ लावू शकतो, हे दाखवून दिले. मग या विषयी रेकॉर्ड किती मिनिटांचे आहेे ते तपासून पाहिले. तेव्हा ५२ मिनिटांचे असल्याचे त्यांना समजले. त्यांनी आपण त्याहून अधिक मिनिटे करू शकतो, असा आत्मविश्वास दाखविला. तसेच तब्बल ९० मिनिटे त्यांनी नाकाला जीभ लावल्याचे रेकॉर्ड केले. त्याची संपूर्ण माहिती इंटरनॅशनल बॅक ऑफ रेकॉर्डला पाठविली. त्यांनी सर्व गोष्टींची पडताळणी केल्यानंतर नुकतेच त्या संबंधीचे प्रमाणपत्र, ट्रॉफी भूमकर यांना पाठविली आहे.
गिनिज रेकॉर्डची तयारी सुरू-
भूमकर हे ७५ वर्षांचे असून, आजही व्यायाम करतात. त्यामुळे त्यांची तब्येत ठणठणीत आहे. ते कसबा पेठेतील शिंपी आळीत राहतात. परिसरात काका या नावाने ते ओळखले जातात. त्यांचे पूत्र हर्षल भूमकर म्हणाले, त्यांचे वय पाहता ९० मिनिटे ते करू शकतील हे वाटलं नव्हते. पण त्यांनी ते पूर्ण केले. त्याहून अधिक करू शकले असते, पण आम्हीच नको म्हणालो. आम्ही आता गिनिज बूक ऑफ रेकॉर्डसाठी सर्व माहिती पाठविली आहे. त्यामुळे हा जागतिक रेकॉर्ड होऊ शकते. कारण आतापर्यत ५२ मिनिटांचे रेकॉर्ड आहे.’’
पुणेरी काकांनी केला रेकॉर्ड! ९० मिनिटे लावली नाकाला जीभ#punepic.twitter.com/0lP87ayJn9
— Lokmat (@lokmat) March 20, 2023
रेकॉर्डची नव्हती कल्पना!
एका ठिकाणी ९० मिनिटे ते देखील नाकाला जीभ लावणे म्हणजे सर्वसामान्य नागरिकाला शक्यच नाही. एक तर जीभ नाकाला लागत नाही. त्यामुळे भूमकर यांना ही कला पूर्वीपासूनच येते. परंतु, त्याचा त्यांनी कधी गाजावाजा केला नव्हता. ही कला देखील रेकॉर्ड म्हणून नोंदविली जाऊ शकते, त्याची माहिती त्यांना नव्हती.