अभिलेख स्कॅनिंगचे काम झाले ठप्प
By admin | Published: June 16, 2015 12:25 AM2015-06-16T00:25:12+5:302015-06-16T00:25:12+5:30
मावळ तहसील कार्यालयातील अभिलेख स्कॅनिंग कक्षातील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन न दिल्याने शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांनी काम
वडगाव मावळ : मावळ तहसील कार्यालयातील अभिलेख स्कॅनिंग कक्षातील कर्मचाऱ्यांचे चार महिन्यांचे वेतन न दिल्याने शुक्रवारपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने अभिलेख स्कॅनिंग ठप्प झाले आहे.
अभिलेख स्कॅनिंग कक्षात मनुष्यबळ व स्कॅनिंग मशिन अपूर्ण व पर्यायी वीजव्यवस्था नसल्याने स्कॅनिंगचे काम संथ गतीने सुरू होते. अभिलेख स्कॅनिंग विभागात पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करावे, स्कॅनिंग मशिनच्या संख्येत वाढ करावी, पर्यायी विजेचा पुरवठा उपलब्ध करून त्वरित स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्रीचे काम पूर्ण करून अद्ययावत अभिलेख आॅनलाइन उपलब्ध करावे, कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन त्वरित द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली.
महसूल विभागातील ७/१२, फेरफार, कडईपत्रक, जतन प्रकरणे व जन्म-मृत्यू नोंद सुमारे ८ लाख अभिलेख व भूमी अभिलेख कार्यालयातील नकाशे, टिपण, योजनापत्रक, वसलेवार, फिल्डबुक, आकारबंद, आकारफोड, जुनी सर्व्हे फाळणी नकाशे व गटवारी नकाशे अशा सुमारे ११ लाख अभिलेखांचे स्कॅनिंग करून अद्ययावत आॅनलाइन उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला दि. ३१ डिसेंबर २०१४ रोजी सुरुवात झाली.
या प्रक्रियेला ३ महिने स्कॅनिंग व २ महिने मेटा डेटा एन्ट्री असा ५ महिन्यांचा कालावधी ठरला असून, मेअखेर पूर्ण करण्याचा कालावधी होता. ११ जूनपर्यंत अभिलेख स्कॅनिंगचे केवळ ६० टक्के काम झाले असून, ४० टक्के अभिलेख स्कॅनिंगचे काम अपूर्ण आहे.
अभिलेख स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्री कामाचा ठेका रिको कंपनीला दिला आहे. सुमारे ११ लाख अभिलेखाचे स्कॅनिंग करण्यासाठी ३ मशिन असून, ६ कर्मचारी कार्यरत आहे. मनुष्यबळ व स्कॅनिंग मशिन अपूर्ण व पर्यायी वीज व्यवस्था नसल्याने स्कॅनिंग संथगतीने सुरू होते.
वेतन न दिल्याने काही कर्मचाऱ्यांनी काम सोडले असून, नवीन कर्मचाऱ्यांना अत्यल्प वेतनावर नियुक्त केले आहे. नवीन कर्मचाऱ्यांना अभिलेख स्कॅनिंग प्रशिक्षण देण्यात वेळ जात असल्याने काम संथ गतीने सुरू होते. त्यांना वेतन वेळेत मिळण्याची शाश्वती नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उदासीनता आहे. स्कॅनिंग विभागातील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०१५पासून वेतन मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदार स्कॅनिंग विभागात फिरकले नाहीत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. स्कॅनिंग विभाग हा विजेच्या भरवशावर सुरू असल्याने स्कॅनिंगचे काम अनेक वेळा ठप्प होत असल्याने पुन्हा मशिन सुरू करण्यासाठी वेळ जात आहे. स्कॅनिंग विभागाच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे.
वीजेसाठी पर्यायी व्यवस्था करून त्वरित काम पूर्ण करून अद्ययावत अभिलेख आॅनलाइन उपलब्ध करावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
अभिलेख स्कॅनिंग कक्षात गतीने अभिलेख स्कॅनिंग होण्याबाबत वारंवार ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. स्कॅनिंग विभागात पुरेसे मनुष्यबळ, पर्यायी विद्युत पुरवठा व्यवस्था व वाढीव स्कॅनिंग मशिन व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. ६० टक्के अभिलेखाचे स्कॅनिंग पूर्ण झाले असून, स्कॅनिंग व मेटा डेटा एन्ट्रीचे मोठ्या प्रमाणात काम अपूर्ण आहे. आता ठेकेदारावर कारवाई करणार आहे.
- शरद पाटील, तहसीलदार