वसुली नेमाने; सुविधांचा अभाव

By admin | Published: September 1, 2016 01:32 AM2016-09-01T01:32:31+5:302016-09-01T01:32:31+5:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील चारपदरी रस्त्याचे काम ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’

Recovering; Lack of facilities | वसुली नेमाने; सुविधांचा अभाव

वसुली नेमाने; सुविधांचा अभाव

Next

लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते यवत (ता. दौंड) या भागातील चारपदरी रस्त्याचे काम ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर आय. आर. बी. (आयडियल रोड बिल्डर) या कंपनीने केले. गेली बारा वर्षे टोलवसुलीचे काम नियमानुसार सुरू आहे. परंतु, शौचालय, मुख्य चौकातील दिवे, सर्व्हिस रोडवर संरक्षक जाळ्या, रुग्णवाहिका आदी सोईसुविधा देण्याबाबत काहीही हालचाली नाहीत.
या कंपनीला कवडीपाट ते यवत या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मिळाले आहे. २७ किलोमीटरच्या कामासाठी ८८ कोटी रुपयांचे बजेट तयार करण्यात आले होते. रस्त्याचे काम पूर्ण करून सन २००४ पासून टोल वसुलीचे काम सुरू केले आहे. १९ वर्षे टोल वसुली करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. त्यानुसार कंपनी कवडीपाट, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व यवत (ता. दौंड) या दोन टोलनाक्यावर वसुली करत आहे.
महामार्गावरील वाहतुकीचा धोका पत्करायला नको म्हणून महिला, शाळेतील मुले, वयोवृद्ध नागरिक या रस्त्याचा वापर करतात. परंतु प्रचंड घाण वास व कुत्रे, डुकरांच्या तावडीतून सुटका करून घेऊन तेथून जाणे म्हणजे एखाद्या दिव्यातून बाहेर पडण्यासारखे आहे. या रस्त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी टोल कंपनीकडे आहे. परंतु कंपनी सहा महिने किंवा वर्षातून एकदा या रस्त्याची जेसीबी मशिन लावून स्वच्छता करताना दिसते.
मुख्य महामार्ग व सर्व्हिस रोड यांच्यामध्ये असणारी जाळी उभी करण्यासाठी छोटासा फूटपाथ तयार करण्यात आला आहे. जाळी चोरी व्हायला लागली, तसेच त्या खालचा फूटपाथही आपोआपच तुटू लागला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. या खड्ड्यांकडेही लक्ष देण्यास टोल वसूल करणाऱ्या कंपनीला अजिबात वेळ नाही. टोल वसुली करणारी कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग व परिसरातील राजकीय नेतेमंडळी यापैकी कुणालाच रस्त्यासंदर्भात जनतेची काळजी घ्यावी, असे वाटत नाही.

Web Title: Recovering; Lack of facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.