वसुली १२०७ कोटी
By admin | Published: April 2, 2017 03:08 AM2017-04-02T03:08:21+5:302017-04-02T03:08:21+5:30
महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार २०७ कोटी ७ लाख रुपयांची करवसुली केली. त्यातील २१० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत.
पुणे : महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार २०७ कोटी ७ लाख रुपयांची करवसुली केली. त्यातील २१० कोटी रुपये आॅनलाईन पद्धतीने जमा झाले आहेत. अखेरच्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला विक्रमी म्हणजे ६७ कोटी रुपयांची वसुली झाली.
प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट मिळकत कर विभागाने ओलांडले असले, तरी स्थायी समितीने दिलेले १ हजार ४४४ कोटी रुपयांचे उद्दिष्ट मात्र त्यांना पार करता आलेले नाही. मागील आर्थिक वर्षात (सन २०१५-१६) या विभागाने १ हजार १७९ कोटी रुपयांची वसुली केली होती. त्यापेक्षा जास्त वसुली या वेळी झाली आहे; मात्र स्थायी समितीच्या अंदाजापेक्षा ती कमी असल्याने अंदाजपत्रकात सुमारे २३७ कोटी रुपयांची घट आली आहे.
महापालिकेच्या नोंदणीपात्र मिळकतधारकांची संख्या ८ लाख ४० हजार आहे. त्यांपैकी ७ लाख ९० हजार मिळकतधारकांनी आपला कर जमा केला आहे. त्यांपैकी २ लाख १५ हजार जणांनी महापालिकेला अपेक्षित असलेल्या आॅनलाईन पद्धतीने कर जमा केला आहे. या पद्धतीने महापालिकेकडे एकूण २१० कोटी रुपये जमा झाली. ही संख्या एकूण संख्येच्या साधारण ३५ टक्के आहे. मागील वर्षी ती अगदीच कमी होती. आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी महापालिका प्रशासन अशा मिळकतदारांना करामध्ये ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सर्वसाधारण सभेने हा प्रस्ताव मंजूर न करता लांबणीवर टाकला आहे.
मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी यांनी सांगितले, की ही सवलत रोख स्वरूपात नाही तर त्यांना त्यांच्या पुढील वर्षीच्या मिळकत करात कमी करून दिली जाईल. १५ क्षेत्रीय कार्यालयांत आॅनलाईन कर जमा करणाऱ्यांमध्ये प्रत्येकी ५ याप्रमाणे सोडत काढून एकूण १५० जणांना आॅनलाईन कर जमा केल्याचे पारितोषिक म्हणून करात ५ टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव आहे. ही सवलतसुद्धा पुढील वर्षीच्या करामध्ये मिळेल. रोखीने व्यवहार करण्याऐवजी बँकेमार्फत व्हावे, असे केंद्र व राज्य सरकारचेही धोरण असून त्यानुसारच या योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे मापारी म्हणाले. (प्रतिनिधी)