विनापासिंग वाहन चालकांकडून पाच वर्षांत ३६ लाखांचा दंड वसुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 07:55 PM2018-04-11T19:55:32+5:302018-04-11T19:55:32+5:30
केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत विनापासिंग वाहन चालविण्यास अथवा ते खरेदीदाराच्या ताब्यात देण्यास कायद्याने मनाई केली आहे.
पुणे : विनापासिंग वाहन दामटणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडले आहे. गेल्या पाच वर्षांत ४ हजार वाहनचालकांकडून तब्बल ३६ लाख २० हजार ६०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. प्रत्येक वाहनचालकाला सरासरी एक हजार रुपयांचा भुर्दंड त्यामुळे सोसावा लागला आहे.
केंद्रीय मोटार वाहन नियमांतर्गत विनापासिंग वाहन चालविण्यास अथवा ते खरेदीदाराच्या ताब्यात देण्यास कायद्याने मनाई केली आहे. संबंधित वाहन वितरकासह असे वाहन चालविणाऱ्या व्यक्तीवर देखील प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) कारवाई करण्यात येते. आरटीओच्या वतीने अशा वाहनांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येते. आरटीओने २०१३ ते फेब्रुवारी २०१८ अखेरीस तब्बल ४ हजार १९ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून ३६ लाख २० हजार ६०० रुपयांच्या दंडाची वसुली केली आहे. चालू वर्षांत जानेवारी महिन्यात ११२ वाहनचालकांकडून १ लाख ४० हजार, तर फेब्रुवारी महिन्यात ५९ वाहनचालकांकडून ६५ हजार रुपयांचा दंड वसुल केला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते वाजिद खान यांनी ही माहिती समोर आणली आहे.
अशा वाहनांवर कारवाई होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. शहरात २०१३ साली ३४२ वाहनचालकांना ३ लाख ५० हजार ८०० आणि २०१४ मध्ये ४६२ वाहनचालकांकडून ३ लाख ३५ हजार ७०० रुपयांचा दंड ठोठावला होता. कारवाई करण्यात आलेल्या वाहनचालकांची संख्या २०१७ मध्ये १ हजार ३३० इतकी झाली. त्यांच्याकडून १५ लाख ४२ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ग्राहकांना मुहूर्तावर वाहने हवी असतात. या काळात मागणी असल्याने ग्राहक देखील अनेकदा पासिंग न करताच वाहन नेणे पसंत करतात. ग्राहकांच्या मागणीपुढे वितरक देखील कोणतीही आडकाठी आणत नाहीत, असे वाहन क्षेत्रातील जाणकारांकडून सांगण्यात आले.
-----------------------------
विना पासिंग वाहनांवरील कारवाई
साल वाहनसंख्या दंडाची रक्कम रुपयात
२०१५ २६३ ५,०२,५००
२०१६ ९५१ ६,८४,६००
२०१७ १,३३० १५,४२,०००
२०१८ १७१ २,०५,०००