ऊस बिलातून विजबिलाची वसुली चुकीची; राज्यभर भाजप आंदोलन करेल, हर्षवर्धन पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 01:01 PM2022-01-30T13:01:24+5:302022-01-30T13:01:36+5:30
राज्य शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकित विज बिलाची वसुली ऊसाच्या बिलातून करण्याच्या निर्णयास हर्षवर्धन पाटील यांनी विरोध केला
बारामती: महाराष्ट्र हे कल्याणकारी राज्य आहे. ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे ऊसाच्या बिलातून आम्ही शेतकऱ्यांची थकित विज बील वसुली होऊ देणार नाही, अशी भूमिका माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे. राज्य शासनाने घेतलेल्या शेतकऱ्यांच्या थकित विज बिलाची वसुली ऊसाच्या बिलातून करण्याच्या निर्णयास हर्षवर्धन पाटील यांनी विरोध केला आहे.
पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केलेली थकीत वीज बिलाची वसुली चुकीची आहे. त्यामुळे थकीत वीज बिलाची अशा प्रकारे शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करण्यास आमचा तीव्र विरोध आहे. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. सदरची चुकीची आलेली कित्येक पट जास्तीची वीज बिले दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेहमीच वापरलेल्या विजेची बिले भरलेली आहेत, असेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. जर शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुलीचा तगादा लावला, तर राज्यामध्ये भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा स्पष्ट इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.