एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात रिकव्हरी रेट १० टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:04+5:302021-05-17T04:10:04+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने आजवरचा उच्चांक गाठल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अर्थात रिकव्हरी ...
प्रज्ञा केळकर-सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येने आजवरचा उच्चांक गाठल्याने बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अर्थात रिकव्हरी रेटही कमी झाला होता. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात रिकव्हरी रेट ८२ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रिकव्हरी रेट १० टक्क्यांनी वाढला असून, तो ९३ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची दररोजची संख्या धडकी भरवणारी ठरली. शहरातील एका दिवसाची रुग्णसंख्या ७००० हून अधिक नोंदवली गेली. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात ८२ टक्क्यांपर्यंत घट झाली. मे महिन्यातील आकडेवारी काहीशी दिलासादायक ठरली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के होते, तर दुसऱ्या आठवड्यात ते ९३ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट १४.४६ टक्के इतका कमी झाला आहे. मृत्यूदर मात्र २.७३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढली होती. रुग्णसंख्या स्थिरावली असल्याचे बोलले जात आहे. मात्र, चाचण्यांची संख्याही सातत्याने कमी झाली आहे. ३ मे ते ९ मे या कालावधीत १,१३,०१४ इतक्या चाचण्या पार पडल्या. १० मे ते १६ मे या कालावधीत ८८,०८४ चाचण्या झाल्या.
------
चौकट १
कालावधी मृत्यूदर पॉझिटिव्हिटी दर
२९ मार्च-४ एप्रिल ०.६३ २५.०२
५ - ११ एप्रिल ०.७३ २४.९३
१२ -१८ एप्रिल ०.९४ २३.७५
१९ - २५ एप्रिल १.११ २१.०८
२६एप्रिल-२मे १.४९ २१.१६
३ मे - ९ मे २.३९ १५.८३
१० मे - १६ मे २.७३ १४.४६
------
चौकट २
तारीख रिकव्हरी रेट
४ एप्रिल ८३.६६
११ एप्रिल ८२.३३
१८ एप्रिल ८२.९१
२५ एप्रिल ८६.०५
२ मे ८८.५०
९ मे ९०.७९
१६ मे ९३.८३