‘यशवंत’च्या संचालकांकडून होणार वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:55 PM2017-11-19T23:55:41+5:302017-11-19T23:56:08+5:30
पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी कारखान्याला साखर निर्यात व्यवहारात सुमारे १३ कोटी रुपये, तर बारदान खरेदीत सुमारे २७ लाख रुपये नुकसान होण्यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचे अखेर निश्चित करण्यात आले.
पुणे : थेऊरच्या यशवंत सहकारी कारखान्याला साखर निर्यात व्यवहारात सुमारे १३ कोटी रुपये, तर बारदान खरेदीत सुमारे २७ लाख रुपये नुकसान होण्यास तत्कालीन संचालक मंडळ जबाबदार असल्याचे अखेर निश्चित करण्यात आले. त्यामुळे संबंधित संचालक मंडळाकडून वसुली करण्याच्या आदेशाला दिलेली स्थगिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी उठविली आहे. परिणामी तत्कालीन २५ संचालकांना वसुलीला सामोरे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यशवंत कारखान्यात साखर निर्यात विक्री, अल्कोहोल विक्री आणि बारदान खरेदीमध्ये कारखान्याचे नुकसान झाल्याचे प्रादेशिक सहसंचालकांनी केलेल्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले होते. याबाबतच्या अहवालात प्रादेशिक सहसंचालकांनी २०१३ रोजी सादर केला होता. संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशी केली जात होती. यासंदर्भातील अहवाल दहा डिसेंबर २०१४ रोजी सादर करण्यात आला. त्यात साखर निर्यात व्यवहारातील नुकसानीपोटी १२ कोटी ८६ लाख रुपये आणि बारदान खरेदीमधील नुकसानीपोटी सुमारे २७ लाख रुपयांची जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळांवर निश्चित करण्यात आली. या अहवालविरुद्ध संचालक मंडळाने अपील केले होते. त्यानंतर तत्कालीन सहकारमंत्र्यांनी दहा फेब्रुवारी २०१५ रोजी वसुलीच्या आदेशाला स्थगिती दिली. परंतु, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी ही स्थगिती उठविण्याची मागणी केली होती. त्यानुसार विद्यमान सहकारमंत्री देशमुख यांनी ही स्थगिती उठविली.
>केवळ ३५ कोटी रुपयांचे तारण कर्ज असताना, यशवंत कारखाना अवसायनात काढण्याचे काम सरकारने केले आहे. सहकार खात्याने लेखापरीक्षकांची कारखान्याच्या प्रशासकपदी नेमणूक केली. परंतु, गेल्या पाच वर्षांत थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्नच
झालेला नाहीत. भीमा पाटस कारखान्याच्या कर्जास राज्य सरकारने हमी देत मदत केली. मग यशवंत कारखान्याला वेगळा न्याय का? असा सवालही खासदार शेट्टी यांनी उपस्थित केला.