कोरोनाने मृत पावलेल्यांच्या वारसांची अनुकंपा भरती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:14 AM2021-08-12T04:14:15+5:302021-08-12T04:14:15+5:30
मोरगाव : राज्य कोतवाल संघटनेकडून चतुर्थ श्रेणी, कोरोनात मृत्यू पावलेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंप भरती आदी मागण्यांबाबत मुख्यमंत्री व ...
मोरगाव : राज्य कोतवाल संघटनेकडून चतुर्थ श्रेणी, कोरोनात मृत्यू पावलेल्या कोतवालांच्या वारसांना अनुकंप भरती आदी मागण्यांबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री याकडे निवेदन देण्यात आले आहे. या मागण्या १५ ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून संपूर्ण राज्यात काम बंद आंदोलनाचा इशारा राज्य संघटनेनेकडून दिला आहे. या मागण्या मान्य न झाल्यास बारामती तालुका कोतवाल संघटना या कामबंद आंदोलनात सहभागी होणार आहे. याबाबतचे निवेदन बारामती तहसीलदार यांना दिले असल्याची माहिती तालुका अध्यक्ष संतोष खोमणे यांनी दिली.
कोतवालांच्या राज्य संघटनेने राज्य शासनाकडे केलेल्या विविध मागण्या १५ ऑगस्टपर्यंत मान्य न झाल्यास १६ ऑगस्टपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या काम बंद राज्यव्यावी आंदोलनात बारामती तालुका कोतवाल संघटनाही सहभागी होणार आहे.
याबाबतचे निवेदन आज बारामती निवासी तहसील धनंजय जाधव यांना दिले. या वेळी तालुका अध्यक्ष संतोष खोमणे, सचिव शेखर खंडाळे, सचिन निकम, राहुल पोमने, विजय स्वामी, बाळासो अंकुश खोमणे, विजय स्वामी, शैलेश नेवसे यांसह सर्व कोतवाल बांधव उपस्थित होते. राज्यातील कोतवालांस चतुर्थ श्रेणी देण्यात यावे, चतुर्थ श्रेणी मिळेपर्यंत वेतनातील अन्यायकारक भेदभाव दूर करून समान काम, समान वेतन या धर्तीवर राज्यातील कोतवालांना सरसकट पंधरा हजार वेतन देण्यात यावा. यांसह कोतवाल संवर्गातील दि. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी शासन निर्णयाबाबत पत्र क्र. ११२ ई १० मार्गदर्शन पत्र रद्द करण्यात यावे. कोतवलांना तलाठी व तत्सम पदामध्ये पन्नास टक्के आरक्षण देण्यात यावा. शिपाई संवर्गाच्या सर्व रिक्त जागा कोतवाल संवर्गातून शंभर पदोन्नती भरणेबाबत. कोरोनासारख्या महामारीत कोरोनाने मरण पावलेल्या कोतवालांच्या जागी अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या वारसांना नियुक्ती करण्यात यावा. सेवानिवृत्ती नंतर कोतवालास कुठल्याही शासकीय लाभ मिळत नसल्याने सेवानिवृत्ती कोतवालास १० लक्ष रुपये एकरकमी निर्वास भत्ता देण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
.......................................................
फोटो ओळ : बारामती येथे निवासी नायब तहसीलदार धनंजय जाधव यांना निवेदन देताना तालुकाध्यक्ष संतोष खोमणे, सचिव शेखर खंडाळे व इतर.
१००८२०२१-बारामती-०९
————————————————