त्या ८५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 04:21 AM2018-07-11T04:21:18+5:302018-07-11T04:21:27+5:30
कॅम्पमधील रोझरी शाळेने नववीतील ८५ विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आल्याच्या तक्रारीवर मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली.
पुणे : कॅम्पमधील रोझरी शाळेने नववीतील ८५ विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अनुत्तीर्ण करण्यात आल्याच्या तक्रारीवर मंगळवारी शिक्षणाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. त्यामध्ये त्या ८५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
कॅम्पमधील रोझरी शाळेने जाणीवपूर्वक नववीतील ८५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनुत्तीर्ण केल्याप्रकरणी मनविसेकडून शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांच्याकडे तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी त्या विद्यार्थ्यांचे पालक, शाळा व्यवस्थापनांचे प्रतिनिधी, मनविसेचे प्रतिनिधी यांची मंगळवारी बैठक घेतली. यावेळी मनविसे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव, मनसे विभागाध्यक्ष प्रशांत मते, पालक प्रतिनिधी गणेश पवार, रहीम शेख, नरेश हंडारे आदी पालक उपस्थित होते.
शाळेने जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण केले असल्याने त्यांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याची मागणी पालकांनी केली.
शिक्षणाच्या दर्जावर प्रश्न
शाळा जर ८५ विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनुत्तीर्ण करीत असेल तर शाळेत दिले जाणारे शिक्षण, तिथला दर्जा यावर विद्यार्थी संघटनांनी प्रश्नचिन्ह उभे केले. त्याचबरोबर शाळेच्या गैरकारभाराबाबतचे अनुभव मांडण्यात आले. या तक्रारी ऐकून घेतल्यावर शिक्षणाधिकाºयांनी शाळेकडून नववीच्या सहामाही व वार्षिक परीक्षा यांच्या उत्तरपत्रिका मागवून घेतल्या आहेत. दुसºया शाळेतील शिक्षकांकडून या प्रश्न उत्तरपत्रिकांची पुनर्तपासणी करून त्याचा निकाल जाहीर करावा, तसेच यावेळी शाळा प्रशासनाने योग्य तोडगा काढला नाही, शाळेचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याची मागणी केली आहे.