पुणे जिल्ह्यात ९०० पोलीस शिपायांची होणार भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 06:21 PM2019-02-02T18:21:17+5:302019-02-02T18:23:56+5:30
पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य ९०० पोलीस शिपाई निवृत्त होणार आहे़.
पुणे : पोलीस शिपाई भरतीचा कार्यक्रम गृह विभागाने जाहीर केला असून, या वर्षभरात रिक्त होणाऱ्या पोलीस शिपाईपदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे़. त्यानुसार पुणे जिल्ह्यात ९०० पदांसाठी भरती केली जाणार असून, राज्य राखीव पोलीस दलासाठी १०० पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे़.
पोलीस भरतीमध्ये यंदापासून काही बदल करण्यात आले असून, त्यानुसार प्रथम लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे़. लेखी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून गुणवत्ता क्रमानुसार प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंख्येच्या १:५ या प्रमाणात प्रवर्गनिहाय उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे़. त्यामुळे चाचणीसाठी बोलविण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी राहणार आहे़.
पुणे शहर, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण आणि लोहमार्ग पुणे या घटकांमध्ये या वर्षभरात संभाव्य ९०० पोलीस शिपाई निवृत्त होणार आहे़. या रिक्त होणाऱ्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे़. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या गट १, २ आणि दौंड येथील गट ५ व ७ मधील जवळपास १०० पदे रिक्त होणार आहेत़. यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या पुणे विभागामार्फत भरती प्रकिया राबविली जाणार आहे़ .