परीक्षा घेतली, नियुक्ती पत्रे देण्याआधी भरतीच केली रद्द; सरकारचा अजब कारभार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 09:57 AM2021-08-13T09:57:55+5:302021-08-13T09:58:56+5:30
विश्वासघात केल्याचा संतप्त उमेदवारांचा आरोप
- अमोल अवचिते
पुणे : सहसंचालक, लेखा व कोषागार या पदांसाठी विभागानुसार ९३२ रिक्त पदांसाठी ९ जानेवारी २०१९ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून फेब्रुवारी-मार्चमध्ये परीक्षा घेण्यात आली. तिसऱ्या निवड यादीच्या उमेदवारांनी नियुक्तीची मागणी केली असता, निवड प्रक्रियेचा एक वर्षाचा कालावधी संपुष्टात आल्याने भरती प्रक्रियाच रद्द केल्याचे पत्र त्यांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परस्पर निर्णय घेऊन सरकारने विश्वासघात केला. स्वप्नील लोणकर सारख्या आत्महत्या का होणार नाहीत, अशा संतप्त प्रतिक्रिया उमेदवारांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
तत्कालीन ‘महापोर्टल’तर्फे घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल जुलै २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यानुसार पहिली, दुसरी आणि तिसरी अशा स्वरूपात निवड याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तिसरी यादी जानेवारी ते मार्च २०२० या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर कागद पडताळणी प्रक्रिया सुरू होती. ‘लॉकडाऊन’मुळे काही उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी होऊ शकली नाही. ‘लॉकडाऊन’संपताच प्रक्रिया पूर्ण करून नियुक्ती दिली जाईल, असे विभागाकडून पात्र सांगण्यात आले. मात्र, परीक्षा प्रक्रियेचा एका वर्षाचा कालावधी संपल्याने भरती प्रक्रिया संपुष्टात आली आहे, असे उमेदवारांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.
१३२ उमेदवार होणार नोकरीपासून वंचित
यामुळे ९३२ पैकी सुमारे १३२ हून अधिक उमेदवारांना नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे. परीक्षेचा अभ्यास करून पात्र होऊनही कोणतीही चुकी नसताना तसेच सरकारच्या हातात असतानाही मिळालेले पद गमवावे लागल्याने उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.