आचारसंहितेत भरतीप्रकिया
By admin | Published: October 26, 2016 06:02 AM2016-10-26T06:02:05+5:302016-10-26T06:02:05+5:30
महापालिका प्रशासनाने अभियंता भरतीसाठी सर्वाधिक जलद प्रक्रिया राबवून परीक्षा घेतली खरी, मात्र आता त्यानंतरची निवड यादी, कागदपत्र तपासणी अशी प्रक्रिया सुरू करण्याला निवडणूक
पुणे : महापालिका प्रशासनाने अभियंता भरतीसाठी सर्वाधिक जलद प्रक्रिया राबवून परीक्षा घेतली खरी, मात्र आता त्यानंतरची निवड यादी, कागदपत्र तपासणी अशी प्रक्रिया सुरू करण्याला निवडणूक आचारसंहितेचा खो बसला आहे. पालिका प्रशासन अत्यंत संथपणे ही प्रक्रिया राबवत असून, पात्र उमेदवारांना तर प्रत्यक्ष नियुक्तिपत्रे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच मिळतील.
स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी अशा तीन विभागांत अभियंत्यांची भरती करण्यासाठी पालिका प्रशासनाने आॅनलाईन परीक्षा, आॅनलाईन निकाल अशा सगळ्या हायटेक प्रक्रियेचा अवलंब केला. तिन्ही विभागांतील मिळून एकूण २१८ जागांसाठी तब्बल २१ जणांनी पालिकेकडे आॅनलाईन अर्ज केले होते. स्वत: आयुक्त कुणाल कुमार यांनी या हायटेक प्रक्रियेत लक्ष घातले होते. पालिकेच्या संगणक विभागाचे प्रमुख राहुल जगताप तसेच आस्थापना विभागाचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांनी त्यांना साह्य केले. पात्र उमेदवारांची यादी करून त्यांना परीक्षेसाठीची तारीख वगैरे सर्व आवश्यक गोष्टी आॅनलाईनच कळविण्यात आल्या. पात्र उमेदवारांनी परीक्षाही आॅनलाईनच द्यायची होती. त्यासाठीची सर्व तांत्रिक तयारी पालिकेने पूर्ण केली.
प्रशासन त्यानंतर गुणांच्या प्राधान्यक्रमानुसार यादी तयार करीत होते, त्याच दरम्यान महापालिकेच्या निवडणूक आचारसंहितेची
घोषणा झाली. त्यानंतर हे सगळे कामच ठप्प
झाले. परीक्षेला बसलेल्यांपैकी एकूण किती उमेदवारांना ९०पेक्षा जास्त गुण मिळाले याचीसुद्धा एकत्रित माहिती प्रशासनाकडे आता तयार नाही. स्थापत्यसाठी २ हजार ४१८, विद्युतसाठी १ हजार २९१ व यांत्रिकीसाठी १ हजार ५०९ उमेदवार पात्र ठरले असल्याची माहिती मिळाली. मात्र त्यालाही अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
ही यादी, त्यानंतर आरक्षणनिहाय तयार करावी लागणारी गुणवत्तानिहाय यादी, त्यानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी, त्याचे एका पदासाठी ५ उमेदवारांचे प्रमाण असे बरेच काम यावर करावे लागणार आहे. मात्र ते काम जवळपास थांबल्यात जमा आहे.
आता बहुधा निवडणूक झाल्यावरच ते सुरू होईल. तसेच पात्र उमेदवारांची मुलाखत व त्यानंतर त्यांना नियुक्तिपत्र या प्रक्रियेलाही निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरचाच मुहूर्त मिळणार आहे.
१८ हजार जणांनी दिली परीक्षा
एकूण अर्जदारांपैकी १८ हजार जणांनी आॅनलाईन परीक्षा दिली. २००पैकी ९० गुण असलेल्यांना पात्र समजण्याचे निश्चित करण्यात आले होते. उमेदवारांनी उत्तरपत्रिका आॅन लाईन सबमीट केली की अवघ्या दोन तासांत त्याचा निकाल आॅनलाईनच टाकला जात होता. त्यामुळे या सर्व प्रक्रियेत कसलाही हस्तक्षेप करायला कोणाला कसली संधीच मिळाली नाही.
तत्काळ निकाल कळत असल्यामुळे उमेदवारांनाही काय झाले ते समजत होते. तिन्ही विभागांसाठी वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका होत्या. त्या तपासण्यासाठीची स्वतंत्र यंत्रणा ठेवण्यात आली होती.
काम थांबलेले नाही. प्रशासन यादी तयार
करते आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे आता लगेच ही प्रक्रिया राबवण्याला मर्यादा आल्या आहेत. या वेळी प्रतीक्षायादीही तयार करण्यात येणार आहे. आचारसंहितेबाबत वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागितले आहे.
प्रकाश बोरसे,
उपायुक्त, आस्थापना विभाग