पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील डॉक्टरांची भरती तूर्तास कंत्राटी पध्दतीने
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 04:31 PM2020-05-11T16:31:18+5:302020-05-11T16:34:58+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडील १७७ पदांकरिता भरती प्रक्रिया...
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य विभागाकडील १७७ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली खरी; परंतू ही कायम पदे असल्याने त्याला मुख्यसभेची मान्यता आवश्यक आहे. सद्यस्थितीत ही मान्यता मिळविणे अवघड असल्याने तूर्तास तीन महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने ही पदे भरली जाणार आहेत. पालिकेकडे तब्बल ११०० ऑनलाईन अर्ज आले आहेत.
मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. याकाळात आरोग्य विभागाकडील मनुष्यबळ कमी पडत आहे. पालिकेच्या विविध विभागातील हजारो पदे रिक्त आहेत. यातील बहुतांश पदे ही आरोग्य विभागातील आहेत. त्यापैकी प्रथम व द्वितीय श्रेणीतील १७७ पदे भरण्यात येणार आहेत.
या अर्जांच्या छाननीला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली असून मेरिट प्रमाणे निवड केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या १७७ रिक्त पदांकरिता २० एप्रिल रोजी जाहिरात देण्यात आली होती. वर्ग एकसाठी ४६१ आणि वर्ग दोनसाठी ५५६ अर्ज आले आहेत. पालिकेच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यासंदर्भात राज्य शासनाला ८ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. साधारणपणे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात शहरात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. हा आकडा अडीच हजाराच्या घरात पोचला आहे. पालिकेसह सर्वच रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स व नर्स कमी पडू लागल्या आहेत.
कोरोनाच्या प्रादुभार्वाला प्रतिबंध करण्यासाठी उपलब्ध मनुष्यबळ कमी पडू लागले आहे. आरोग्य विभागाला अधिकाधिक मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागातील रिक्त पदांसह एकूणच १ हजार ८६ रिक्त पदे भरण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. आॅनलाईन पद्ध्तीने आलेल्या अर्जांच्या छाननीसह प्रत्यक्ष अर्ज केलेल्या डॉक्टरांच्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी केली जात आहे. त्याकरिता अर्जदारांना पालिकेमध्ये बोलावून त्यांच्याकडून माहिती घेतली जात आहे. या भरतीमुळे पालिकेला कोरोनाशी लढण्याकरिता मनुष्यबळ प्राप्त होणार आहे.
-------
पालिका भरणार असलेली १७७ पदे ही कायम सेवेतील पदे आहेत. परंतू, या पदांकरिता पालिकेच्या मुख्य सभेची मान्यता आवश्यक आहे. कोरोनाची सद्यस्थिती पाहता आणखी काही महिने मुख्यसभा होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे तुर्तास ही पदे तीन महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून त्यानंतर मुख्यसभेची मान्यता घेऊन त्यांना मंजुरी देण्यात येण्याची शक्यता आहे.