भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच फोडला सैन्य भरती पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:10 AM2021-05-19T04:10:40+5:302021-05-19T04:10:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणाऱ्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीय सैन्य दलातील वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविणाऱ्या सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकाऱ्यानेच सैन्य भरती पेपर फोडला असून, या रॅकेटचा तोच मुख्य सूत्रधार असल्याचे पुणे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. या मुख्य सूत्रधार अधिकाऱ्यास सिकंदराबाद व त्याच्या साथीदारास दिल्ली येथून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
भगतप्रीतसिंग बेदी (रा. सिकंदराबाद) असे भरती प्रक्रिया प्रमुख लेफ्टनंट कर्नलचे नाव आहे. त्याचा साथीदार नारनेपाटी वीरप्रसाद (रा. दिल्ली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
सैन्य दलातील कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांसाठी आर्मी शिपाई पदासाठी भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा २८ फेब्रुवारी रोजी भारतभरातील ४० केंद्रांवर होणार होती. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडून काही व्यक्ती ती प्रश्नपत्रिका व्हॉटसॲपवरून वेगवेगळ्या खासगी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र प्रमुखांना भरघोस रक्कमेला विकणार असल्याची गोपनीय माहिती सदर्न कंमाड मिलिटरी इंटेलिजन्सच्या लायझन युनिटला मिळाली होती. ही गोपनीय माहिती त्यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कळविली.
त्यानंतर पुणे पोलिसांच्या दोन वेगवेगळ्या पथकाने वानवडी आणि विश्रांतवाडी परिसरात सापळा रचून कारवाई करून किशोर गिरी (रा. माळेगाव), माधव गित्ते (रा. सॅपर्स विहार कॉलनी, विश्रांतवाडी), गोपाळ कोळी (रा. बीईजी सेंटर, दिघी), उदय औटी (रा. बीईजी सेंटर, खडकी) यांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांना हा पेपर तमिळनाडू येथील आर्मी अधिकारी थिरु मुरगन याने दिल्याचे निष्पन्न झाले. त्याला अटक केली. हा पेपर त्याला दिल्लीतील अधिकारी वसंत किलारी याच्याकडून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली.
त्यानंतर सिकंदराबाद येथील भरती प्रक्रिया प्रमुख अधिकारी भगतप्रीतसिंग बेदी यानेच पेपर लिक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक भालेराव, हवालदार अतुल साठे व राजपूत यांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन बेदी याला दिल्लीहून ताब्यात घेऊन अटक केली. नारनेपाटील वीरप्रसाद याला पोलीस उपनिरीक्षक चव्हाण, सहायक फौजदार वांजळे, पोलीस नाईक केकाण यांनी अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा, सहायक पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेंडगे, पांडुरंग वांजळे, यशवंत ओंबासे, अतुल साठे, प्रवीण राजपूत, मधुकर तुपसौंदर, नितीन कांबळे, अश्विनी केकाण, राजेंद्र लांडगे, गजानन सोनवलकर, प्रफ्फुल चव्हाण, पिराजी बेले यांच्या पथकाने केली.