विद्यार्थी-पालकांचे भरपावसात हाल
By admin | Published: June 28, 2017 04:26 AM2017-06-28T04:26:42+5:302017-06-28T04:26:42+5:30
विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध कामांसाठी शिवाजीनगर येथील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना सुविधांअभावी भरपावसात मनस्ताप सहन करावा लागत आहे. गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील दुरुस्ती यांसह विविध कामांसाठी केवळ एकच काउंटर ठेवण्यात आल्याने दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथील कर्मचारी, सुरक्षारक्षकांबरोबर विद्यार्थी व पालकांचा वाद होताना दिसत आहे.
राज्य मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मंडळाकडून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन, गुणपत्रिकेतील चुकांची दुरुस्ती करण्यासाठी सुविधा दिली जाते. मंडळाच्या विभागीय कार्यालयांमधून ही प्रक्रिया केली जाते. पुण्यात शिवाजीनगर येथे विभागीय कार्यालय असून गेल्या काही दिवसांपासून येथे गर्दी होत आहे. सर्व कामांसाठी मंडळाकडून केवळ एकाच काउंटरवर सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अर्ज व शुल्क भरण्यासाठी या काउंटरवर मोठी गर्दी होत असून विद्यार्थी व पालकांना दोन-तीन तास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातच सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्याने त्यांना पावसात भिजण्याशिवाय पर्याय नाही. मंडळाकडून त्यासाठीही काहीही व्यवस्था केलेली नाही.
रांग धीम्या गतीने पुढे सरकत असल्याने विद्यार्थी, पालकांना शुक्रवारी मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे तेथील कर्मचारी व सुरक्षारक्षकांसोबत त्यांची वादावादीही झाली. पण एकच काउंटर असल्याने कर्मचाऱ्यांकडूनही काहीही केले जात नव्हते. तीन-तीन तास रांगेत उभे राहूनही अर्ज भरले जात नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. एवढे शुल्क घेऊनही चांगली सुविधा दिली जात नाही, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.