आराेग्य खात्यात पैसे घेऊन पदभरती? पाबळ ग्रामीण रुग्णालयातील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 12:14 PM2023-09-02T12:14:34+5:302023-09-02T12:15:02+5:30
याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आराेग्य विभागाकडे केली आहे...
पुणे : पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात विविध पदांवर मणुष्यबळाची भरती करण्यात येत आहे. पाबळ येथे १६ कंत्राटी पदे भरण्यात येणार आहेत. परंतु या पदभरतीसाठी एजंटांकडून पैसे घेतले जात आहेत. याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांनी आराेग्य विभागाकडे केली आहे. याबाबत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य आयुक्त, आरोग्य संचालक, आरोग्य उपसंचालक यांच्याकडे निवेदन दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील पाबळ, मलठण, यवत, इंदापूर, बावडा, भिगवण येथील उपजिल्हा रुग्णालयात एक वर्षाच्या करारावर कंत्राटी पद्धतीने ११२ मनुष्यबळाची भरती करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुप या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. येथे स्टाफ नर्स, एक्स रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, कनिष्ठ लेखनिक, बाह्यरुग्ण लेखनिक, शस्त्रक्रिया विभाग कामगार, ब्लड बँक सहायक, अपघात विभाग सहायक, ब्लड बँक तंत्रज्ञ, डायटिशन, ईसीजी तंत्रज्ञ, शिपाई, वॉर्ड बॉय आणि सफाई कामगार अशी विविध पदे भरण्यात येणार आहेत.
भरती प्रक्रिया पारदर्शक होऊन कोरोना काळात काम केलेल्यांना तसेच स्थानिकांना प्राधान्य द्यावे. भरती प्रक्रियेत गैरव्यवहार होत असल्याने नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुप यांचे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी टाव्हरे यांनी केली आहे.
आरोग्य सहसंचालक डॉ. विजय बाविस्कर आणि डॉ. विजय कंदेवाड यांनी तातडीने डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य उपसंचालक यांना चौकशीचे लेखी निर्देश देऊ, अशी चर्चेवेळी ग्वाही दिली असल्याचे टाव्हरे यांनी सांगितले.
जिल्ह्यात सहा ठिकाणी कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात येत आहे. या पदभरतीमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार होत असतील तर त्याची लेखी तक्रार करावी. त्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. पाबळमध्ये स्थानिकांकडून पदभरतीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न होत होता. त्यास प्रतिसाद न मिळाल्याने खोटी माहिती दिली जात आहे.
- राधाकिशन पवार, उपसंचालक, पुणे परिमंडळ