खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडलेले आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 01:06 PM2018-11-28T13:06:27+5:302018-11-28T13:13:03+5:30
इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
पुणे: इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या रब्बीच्या आवर्तनास एक महिना पूर्ण झाला आहे. सध्या दौंड-भिगवन परिसरातील शेतीसाठी पाणी दिले जात असून लवकरच पाटस व यवत भागातील शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बीचे आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.
दांडेकर पुलाजवळ झालेल्या कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद ठेवावे लागले होते.पावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही करता आल्या नाहीत.मात्र,काही भागात पावसाच्या हलक्या सरीनंतर जमिनीत निर्माण झालेल्या ओलाव्यावर काही शेतक-यांनी पेरण्यात केल्या होत्या.त्यामुळे ही पिके थोडी तग धरून होती.मात्र,कालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर झाला.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.परंतु,जलसंपदा विभाग व महापालिका प्रशासनाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर २७ आॅक्टोबर रोजी कालव्यातून पाणी सोडण्यात आले.कालव्याद्वारे खडकवासला धरणातून सध्या १२५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.पाणी सोडून एक महिना पूर्ण झाला आहे.परंतु,ग्रामीण भागातील सर्व क्षेत्राला पाण्याचे वितरण न झाल्याने येत्या १५ डिसेंबरपर्यंत कालवा सुरू ठेवला जाणार आहे.
राज्यात दुष्काळी परिस्थिती असून पुणे जिल्ह्यातील धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.परंतु,२८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वषार्पेक्षा यंदा धरण प्रकल्पात ४.६३ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे.मात्र,पालिका प्रशासनाकडून १३५० एमएलडी पाणी उचलले जात असल्याने उन्हाळी आवर्तण सोडण्यास अडचण येणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पुणेकरांना पिण्यासाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी कसे देता येईल,याबाबत जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.