यवत गावात रेड अलर्ट, ११ दिवस कडकडीत बंदचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:28+5:302021-05-13T04:10:28+5:30
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत गाव हाय अलर्ट म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन ...
जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांनी यवत गाव हाय अलर्ट म्हणून घोषित केले आहे. गावातील नागरिक व व्यापाऱ्यांकडून नियमांचे पालन केले जात नाही. आजूबाजूच्या गावांमधून विविध गोष्टींच्या खरेदीसाठी लोक बाजारपेठेत येतात. यामुळे गावात गर्दीचे प्रमाण वाढते यातूनच गावातील बाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. प्रशासनाने विविध नियम घातलेले असताना देखील सर्रासपणे सर्व नियम पायदळी तुडवत परवानगी नसलेली दुकाने गुपचूपपणे चालू ठेवली जातात.
याबाबत आज यवत ग्रामस्तरीय समितीची बैठक यवत ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष व यवतचे सरपंच समीर दोरगे, सहअध्यक्ष व तलाठी कैलास भाटे, सचिव राजाराम शेंडगे आदी सदस्य उपस्थित होते.
बैठकीत गावातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि वाढता धोका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यापुढे गावात ठोस उपाययोजना व कडक लॉकडाऊन करण्याबाबत निर्णय घेण्यात आले. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार गावात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यवत गावात शुक्रवार (दि.१४) पासून मंगळवार (दि.२५) पर्यंत सलग ११ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
जनता कर्फ्यूच्या काळात दवाखाने व मेडिकल दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असेल दूध विक्री केवळ घरपोच करता येणार असून सकाळी ७ ते ९ सायंकाळी ७ ते ८ घरपोच सेवा देता येणार आहे. कृषीविषयक दुकानांसाठी सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू ठेवता येणार आहे. यात हार्डवेअर दुकानांना परवानगी देण्यात आलेली नाही. इतर कोणतीही दुकाने उघडण्यास कोणालाही परवानगी असणार नाही.
गुपचूप दुकाने उघडल्यास कोणाचीही हयगय करणार नाही : सरपंच समीर दोरगे
गावातील कोरोनाची साथ आटोक्यात येण्यासाठी ११ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय गावस्तरीय समितीने घेतला आहे. या काळात नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यापारी व नागरिकांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या काळात दुकाने उघडल्यास कसलीही हयगय न करता कडक कारवाई करणार असल्याचा इशारा सरपंच समीर दोरगे यांनी दिला आहे.