घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवण्यात आहे अंधश्रद्धा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 03:33 PM2018-12-15T15:33:28+5:302018-12-15T15:36:11+5:30
घरासमाेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्री येत नाहीत हा समज चुकीचा असल्याचे पशुवैद्यकांनी सांगितले.
पुणे : घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे फिरकत नाही असा समज अनेकांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील शिवाजीनगर आणि लाेहगाव भागात अनेक घरांसमाेर अशा बाटल्या ठेवल्याचे दिसून येत आहे. याबाबत पशु वैदीकांशी संपर्क केला असता हा समज चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कुत्री ही कलर ब्लाईंड असल्याने त्यांना केवळ कृष्णधवल चित्र दिसते असेही त्यांनी सांगितले.
घरासमाेर लाल रंगाच्या पाण्याची बाटली ठेवल्यास कुत्री घराजवळ फिरकत नाहीत. तसेच घाण करत नाहीत अशी अंधश्रद्धा अनेक नागरिकांमध्ये आहे. शहरातील लाेहगाव आणि शिवाजीनगर भागात काही नागरिकांनी आपल्या घरासमाेर एका प्लाॅस्टिकच्या बाटलीमध्ये लाल पाणी भरुन ठेवले आहे. यामुळे कुत्री येत नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु प्राणी हे कलर ब्लाईंड असल्याने त्यांना केवळ प्रत्येक गाेष्ट ही कृष्णधवल दिसते. त्यामुळे घरासमाेर अशी बाटली ठेवल्याने कुठलाही उपयाेग हाेत नसल्याचे मत पशुवेद्यकांनी व्यक्त केले.
डाॅ. मिलिंद हाथेकर म्हणाले, घरासमाेर लाल पाण्याची बाटली ठेवल्याने कुत्रे येत नाही ही चुकीची समजूत आहे. कुत्र्यांना कुठलाही रंग कळत नाही. त्यामुळे अशा प्रकारे बाटली ठेवल्याने कुठलाही फरक पडणार नाही. नागरिकांनी अशा कुठल्याही अफवेला बळी पडू नये. डाॅ. संदीप गायकवाड म्हणाले, अशी बाटली ठेवणे चुकीचे आहे. शास्त्रीय दृष्ट्या त्याला कुठलाही अर्थ नाही. कुत्री जर घरासमाेर घाण करत असतील तर ते ज्या ठिकाणी घाण करतात त्याठिकाणी त्यांना जेवण किंवा पाणी ठेवल्यास ते तिथे घाण करणार नाहीत. तसेच कुत्री घराजवळ येऊ नये यासाठी त्यांच्या जीवाला धाेका पाेहचेल असे कुठलेही कृत्य करणे चुकीचे आहे.