'रेड डॉट' कॅम्पेनमुळे पुणे शहरातील सॅनिटरी कचऱ्याचे होणार 'रिसायकलिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 02:24 PM2021-05-05T14:24:49+5:302021-05-05T14:26:32+5:30
सॅनिटरी पॅड्स व डायपर्स यासारख्या कचऱ्याचे सुरक्षित संकलन, व्यवस्थापूर्ण वाहतूक आणि शाश्वत पद्धतीने रिसायकलिंग करण्यावर 'रेड डॉट'मोहीम लक्ष केंद्रित करते
पुणे: शहरात दरवर्षी साधारणपणे २.७ कोटी वापरलेल्या सॅनिटरी पॅड्सचा कचरा तयार होतो. ही आकडेवारी धक्कादायक आहे. शहरातील ८ लाख घरातून दररोज कचरा गोळा करून त्याची व्यवस्थित विल्हेवाट व रिसायकलिंग करणाऱ्या 'स्वच्छ' संस्थेच्या कचरा वेचकांनी ही समस्या स्वतः अनुभवली आहे.मात्र सॅनिटरी कचऱ्याच्या 'रिसायकलिंग'चा उपक्रम शहरात सुरु होत आहे. यापुढे, ओला व सुका या कचऱ्याच्या प्रकारांबरोबरच सॅनिटरी कचऱ्याचे देखील वर्गीकरण केले जाईल.
स्वच्छ पुणे, पुणे महानगरपालिका आणि आघाडीचे सॅनिटरी उत्पादन निर्माते पी अँड जी यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु होणाऱ्या उपक्रमामुळे लँडफिलला सॅनिटरी टाकणे किंवा जाळणे याऐवजी त्याचे योग्य मार्गाने रिसायकलिंग केले जाणार आहे.
सॅनिटरी पॅड्स व डायपर्स यासारख्या कचऱ्याचे सुरक्षित संकलन, व्यवस्थापूर्ण वाहतूक आणि शाश्वत पद्धतीने रिसायकलिंग करण्यावर 'रेड डॉट'मोहीम लक्ष केंद्रित करते. महानगरपालिकेच्या गाड्या वेगळा दिलेला सॅनिटरी कचरा डेपोपर्यंत पोहचवतील आणि तिथून पी अँड जी स्थापित यंत्रणेमार्फत या कचऱ्याचे रिसायकलिंग केले जाणार आहे.
'स्वच्छ' संस्थेने पर्यावरण व कचरा व्यवस्थापन विषयावर आधारित व 'रेड डॉट' व्यवस्थेची माहिती देण्यासाठी नुकताच आयोजित केला होता. त्यात विविध जाणकारांची उपस्थिती होती.
स्वच्छ संस्थेच्या सभासद असलेल्या विद्या नाईकनवरे म्हणाल्या, मी गेल्या १६ वर्षांपासून कचरा हाताळत असून रिसायकलिंगला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अगदी सुरुवातीला माझ्यासारख्या अनेक कचरा वेचकांना नागरिक मोठ्या माणसांचे किंवा लहान बाळांचे डायपर्स किंवा सॅनिटरी पॅड कशातही गुंडाळून न देता द्यायचे. आम्हाला ते आमच्या उघड्या हातांनी हाताळावे लागत. तो आमच्यासाठी खरंच एक किळस आणणारा अनुभव होता. त्यानंतर आम्हाला जेवायची सुद्धा इच्छा होत नसत. आम्ही ही परिस्थिती बदलायचं ठरवलं. नागरिकांना आता सॅनिटरी कचरा कागदात गुंडाळण्याची सवय लागत आहे. पण, या कालावधीत सॅनिटरी कचऱ्याचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या माजी अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या, "आज अनेक वर्षांपासून कचरा वेचक कष्ट घेऊन आपले शहर स्वच्छ ठेवत आहेत. आपल्या सर्वांच्या व खासकरून महिलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या सॅनिटरी कचऱ्यासारख्या महत्वाच्या विषयाला वाचा फोडत आज मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे लक्ष या प्रश्नाकडे वेधून घेण्याचं श्रेय स्वच्छ संस्थेला द्यायला हवं. आज सॅनिटरी कचऱ्याच्या योग्य विल्हेवाटीसाठीची उपाययोजना आपल्या शहरात येत आहे. असे करणारे भारतातील पहिलेच शहर बनण्याचा बहुमान पुण्याला मिळत आहे.
.......
वाढत्या शहरीकरणामुळे मागील काही वर्षात पुणे शहरातील सॅनिटरी कचऱ्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे, सॅनिटरी कचऱ्याच्या सुरक्षित हाताळणी व विल्हेवाटीसाठी व्यावहारिक व शाश्वत अशा उपाययोजनेची गरज होती. स्वच्छ व पी अँड जी ह्यांच्या सोबत केला जाणारा भारतातील पहिला 'सॅनिटरी कचऱ्याचा रिसायकलिंग' उपक्रम हा नक्कीच पुणे शहरासाठी उपयुक्त ठरेल.
डॉ. केतकी घाटगे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पुणे महानगरपालिका.
......
शहरातील १२०० टन एवढा कचरा रोज हाताळत असून त्यातील साधारणपणे २२० टन एवढा कचरा दररोज रिसायकल करतात व ८०० टन कचरा खतनिर्मितीकडे वळवला जातो. यामुळे पुण्याच्या घनकचरा व्यवस्थापनावरील ताण लक्षणीय स्वरूपात कमी झाला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या हेतूने स्वच्छ हा नागरिक, स्थानिक प्रशासन आणि विविध उत्पादन निर्माते ह्यांच्यातील महत्वाचा दुवा बनला आहे.
- हर्षद बर्डे, संचालक, स्वच्छ संस्था.