उन्हामुळे रक्त पडतेय कमी
By admin | Published: May 4, 2015 03:16 AM2015-05-04T03:16:21+5:302015-05-04T03:16:21+5:30
उन्हाची दाहकता व शहरवासीयांनी स्वत:साठी दिलेला वेळ, त्यातून भटकंतीत दाखविलेली व्यस्तता यातून रक्तदान शिबिरांची वाणवा असल्याचे चित्र आहे.
अंकुश जगताप, पिंपरी
उन्हाची दाहकता व शहरवासीयांनी स्वत:साठी दिलेला वेळ, त्यातून भटकंतीत दाखविलेली व्यस्तता यातून रक्तदान शिबिरांची
वाणवा असल्याचे चित्र आहे. परिणामी, शहरातील रक्तपेढ्यांमध्ये मागणीच्या तुलनेत ४० टक्के कमी रक्तसाठा असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. शहरामध्ये वाढलेले ऊन आणि त्यातून असह्य झालेला उकाडा यांमुळे नागरिक पुरते
हैराण होत आहेत. त्यामुळे
बहुतेक खासगी, तसेच शासकीय कामगार वर्ग, उद्योजक सुटीचे नियोजन करून थंड हवेच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले आहेत. जे नागरिक शहरात आहेत ते उन्हापासून बचाव करण्यातच दंग आहेत.
इतर दिवसांमध्ये शहरामध्ये विविध सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे, ज्येष्ठ नागरिक मंडळे, तरुण मंडळे, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय क्षेत्रातील संस्था, वाढदिवसाचे औचित्य साधून बहुतेक राजकीय कार्यकर्ते आरोग्य तपासणीबरोबरच रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात. त्यामुळे रक्तपिशव्यांचा पुरवठा नियमित व्हायचा. मात्र, सध्या उन्हाची दाहकता अधिक असल्याने रक्तदात्यांकडून किती प्रतिसाद मिळेल, याचा विचार करून अशा संस्था, मंडळांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचा विचार केला जात नसल्याचे दिसत आहे. निवडणुकीचा काळ सरला असल्याने उत्साही राजकीय कार्यकर्तेही अशा शिबिरांसाठी निरुत्साही झाल्याचा अनुभव येत आहे. त्यामुळे रक्ताची कमतरता जाणवत आहे. रक्तासाठी नातवाइकांना धावाधाव करावी लागत आहे.
शहरात महापालिकेच्या तालेरा रुग्णालयात क्रांतिवीर चापेकर रक्तपेढी आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील विश्वेश्वर रक्तपेढी, खराळवाडी येथील ‘पीएसआय’ या मोठ्या रक्तपेढी आहेत. इतरही खासगी रुग्णालयांमधील रक्तपेढ्या आहेत. त्यापैकी अनेक पेढ्यांमधील रक्तसाठा घटत असल्याची माहिती संबंधितांनी दिली. मात्र, खासगी पेढ्या असल्याने अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे टाळले.