शिकाऊ परवान्याचा कालावधी कमी करा
By admin | Published: February 20, 2016 12:48 AM2016-02-20T00:48:41+5:302016-02-20T00:48:41+5:30
परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अर्जदारांना एक ते दोन महिने तर काही कार्यालयांमध्ये तीन ते चार महिने कालावधी लागत आहे.
पिंपरी : परिवहन कार्यालयांमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अर्जदारांना एक ते दोन महिने तर काही कार्यालयांमध्ये तीन ते चार महिने कालावधी लागत आहे. या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी, प्रमुखांनी दरमहा शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी अपॉइंटमेंट प्रक्रियेचा आढावा परिवहन आयुक्त कार्यालयाला पाठविणे बंधनकारक करण्यात आले आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणेही गरजेचे होते, असे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पाठविण्यात आले आहे.
शिकाऊ व पक्का परवाना काढण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जदारांना दोन ते तीन महिने वेळ लागत आहे. अपॉइंटमेंट घेण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आॅनलाइन सुविधा सुरू केली आहे. मात्र, अनेक दिवस पाठपुरावा घेऊनसुद्धा अर्जदारांना आरटीओचे संकेतस्थळ प्रतिसाद देत नाही. संकेतस्थळ उघडले, तर अर्ज भरेपर्यंत बंद होते. अशा अनेक अडचणी अर्जदारांना येत आहेत. यामार्फत अपॉइंटमेंट मिळाली, तरी आरटीओत चाचणीसाठी वेळ लागतो. अर्जदारांची रांगच्या रांग आरटीओत पाहायला मिळतात. आरटीओच्या फेऱ्या मारून संबंधित हैराण झाले आहेत.
कार्यालय प्रमुखाने उमेदवारांना शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणीकरिता अपॉइंटमेंट मिळण्यास किती कालावधी लागतो, याचा तत्काळ व दरमहा आढावा पाठविण्यास यावा, असे निर्देश आरटीओ कार्यालयाला दिली आहेत. ज्या कार्यालयामध्ये अपॉइंटमेंटसाठी १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागेल, त्या कार्यालयाच्या प्रमुखांना सूचना देण्यात आली आहे की, शिकाऊ व पक्का परवाना चाचणीकरिता ठरवून दिलेला कोटा व दैनंदिन गैरहजर राहणाऱ्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता त्यानुसार कोट्यामध्ये वाढ करण्यात यावी.
गैरहजर राहिलेल्या उमेदवारांच्या ऐवजी पुढील दिनांकाच्या अपॉइंटमेंट मिळालेल्या उमेदवारांना स्वीकारु नये. ज्या उमेदवारांना पुढील तारखेची अपॉइंटमेंट मिळाली असेल व शिकाऊ परवाना मुदत सुरू आठवड्यात
संपत असेल, त्या उमेदवारांना
पक्क्या परवाना चाचणीसाठी अनुपस्थित उमेदवारांच्या जागी समायोजित करावे. (प्रतिनिधी)