नीरेच्या आठवडीतील बाजारातील गर्दी कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:26+5:302021-03-16T04:12:26+5:30
नीरा: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यातही काही निर्बंध आहेत. तसेच ...
नीरा: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले. पुण्यातही काही निर्बंध आहेत. तसेच कोरोनाचे नियम पाळत काही ठिकाणी आठवडे बाजार भरवले जातात. पुरंदर तालुक्यातील नीरेच्या बाजारातही मर्यादित अशी गर्दी पहायला मिळत होती. गेल्या दोन-तीन वेळा नीरेच्या बाजारात मोठी गर्दी पहायला दिसली. शेजारील सातारा जिल्ह्यात आठवडे बाजार भरत नसल्याने शेतकरी, व्यापारी तसेच जिल्हा सीमेलगत असणाऱ्या गावातील नागरिकांचा ओढा नीरेच्या बाजाराकडे लागला आहे. त्यामुळे गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, या गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणाऱ्या नीरेचा बाजार सर्वात मोठा आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील लोक या ठिकाणी येत असतात. पुरंदर तालुक्यातील जेऊर, मांडकी, लपतळवाडी, पिसुर्डी, पिंपरे (खुर्द), गुळुंचे, राख, कर्नलवाडी, बारामती तालुक्यातील निंबुत, खंडोबाचीवाडी, गरदरवाडी, खंडाळा तालुक्यातील पाडेगांव, रावडी, मिरेवाडी, बाळुपाटलाचीवाडी, पिंपरे (बुद्रूक) आदी गावातील शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी नीरेत येत असतात. विशेष म्हणजे नीरेच्या बाजारात भाजी विक्रेत्यांपेक्षा इतर वस्तूंची विक्री जास्त होत असते. भाजी विक्रेते मुख्य मंडईच्या बाहेर आणि मुख्य मंडईत खारी, बटर, टोस्ट, भेळ, वडापाव, भजी, व इतर उघड्यावर तयार केलेले अन्न पदार्थ यांना ग्रामपंचायतीच्या ठेकेदार कडून जादा जागा दिली जाते. त्यामुळे मोकळ्या जागेत बसणाऱ्या भाजीविक्रेत्यांमुळे सांयकाळी तोबा गर्दी होते.
बाजारकट्टे रिकामे आणि गावभर बाजार अशी परिस्थिती असून बाजार कट्ट्यावर किराणा व्यावसायिक आपले दुकन थाटतात. गर्दी कमी म्हणून ट्रक, टँपो सर्रास बाजारतच लावतात यामुळे जागा व्यापली जात आहे. त्या मुळे गर्दी अधिकच दिसत आहे. कोरोना काळात नीरेचा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. मात्र, त्यानंतर हळूहळू सुरु करण्यात आला. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक निर्बंध लादण्यात आले आहे. पुण्याच्या लगत असणाऱ्या सातारा जिल्ह्याने तर आठवडे बाजार बंद केले आहे. तसेच लोणंद बाजारही गेल्या आठवड्यात भरला नाही. त्यामुळे नीरेच्य बाजार व्यापाऱ्यांसह खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
नीरा बाजार गर्दी होत असल्याने कोरोनाच्या नियमांना तिलांजली मिळत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मास्क अनिवार्य असतानाही अनेक विनामास्क तसेच विनाकारण फिरताना बाजारात आढळतात. गेल्या दोन वेळा भरलेल्या बाजारातील गर्दी पाहता उद्याच्या बाजारातही गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या काही दिवसांमध्ये नीरा येथे कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी नीरेत सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ४६ वर पोहोचली. त्यातच आता बुधवारी आठवडे बाजार भरणार आहे. परजिल्ह्यातील नागरिका बाजारात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे.
नीरा येथे सक्रीय बाधितांची संख्या ४६
नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत नीरा परिसरातील पाच गावे येतात. या पाच गावांत सोमवारी ( दि. १५) एकुण ४६ कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. नीरा शहर १४, पिंपरे (खुर्द) १२, गुळुंचे - कर्नलवाडी ०९ व मांडकी १ रुग्ण सक्रीय आहेत.
१५ नीरा संग्रहीत छायाचित्र