विज्ञानाचा अभ्यासक्रम ५० टक्के कमी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:12+5:302021-01-16T04:14:12+5:30
खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविताना अडचणी निर्माण होतात ...
खोडद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कमी असल्याने विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिकविताना अडचणी निर्माण होतात म्हणून विज्ञान विषयाचा ५० टक्के अभ्यासक्रम कमी करण्याची मागणी जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाने केली. माहिती विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी दिली.
कोरोनाचे सावट अद्यापही पूर्णतः संपलेले नाही परंतु शासनाच्या आदेशानुसार २३ नोव्हेंबरपासून ९ ते १० वीच्या शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र पूर्ण क्षमतेने शाळा भरत नसल्याने विज्ञान विषय शिकविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. विज्ञान हा विषय उपक्रम व प्रात्याक्षिके या शिवाय अपूर्ण आहे. कोरोनामुळे शाळा उशिरा सुरू झाल्या आणि प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत उपस्थित राहू शकत नाहीत, त्यामुळे उपक्रम व प्रात्याक्षिके घेऊन विज्ञान विषय शिकविणे शिक्षकांसाठी तारेवरची कसरत आहे. म्हणून पुढील कालावधीत अभ्यासक्रम व प्रात्याक्षिके पूर्ण करणे आणि पूर्वपरीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा व बोर्ड परीक्षा पूर्ण करण्यासाठी अपुरा वेळ असल्याने विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम ५० टक्के कमी करावा, अशी मागणी राज्य विज्ञान महामंडळ यांचेबरोबर जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाने देखील केली आहे. सध्या शाळेमध्ये चार तास आणि चारच विषय शिकवले जात आहेत. बाकीच्या विषयांचे तास ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना शिकविण्यात व विद्यार्थ्यांना समजावून घेण्यात मर्यादा येत आहेत.
--
कोट
"एसएससी बोर्डाने विज्ञान विषयाचा २५ टक्के अभ्यासक्रम कमी केलेला असला तरी विज्ञानातील काही संकल्पना ऑनलाइनने समजून सांगणे कठीण आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइनचा लाभ घेता आला नाही त्यांना ऑफलाइनद्वारे सर्व प्रकरणे शिकविणे इतक्या कमी वेळात शक्य होणार नाही, तसेच प्रात्यक्षिक हा भाग पूर्ण करणेही एक आव्हानच आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यातील विज्ञान शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन ५० टक्के भागच परीक्षेसाठी ठेवावा."
- रतिलाल बाबेल अध्यक्ष, जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघ