विद्यार्थ्यांवरचे अभ्यासक्रमाचे ओझे कमी करणार : प्रकाश जावडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 09:08 PM2018-05-30T21:08:25+5:302018-05-30T21:08:25+5:30
सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील.
पुणे: शालेय विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याबाबत केंद्र शासनाकडून हालचाली केल्या जात असून देशभरातील हजारो नागरिकांनी याबाबत केंद्राकडे सूचना पाठविल्या आहेत. त्यानुसार २०१९- २० या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात काही बदल केले जातील. शारीरिक शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, बुध्दीमत्तेला चालणा देणारी आणि विचार करण्यास लावणारी नवीन शिक्षण पध्दती यापुढील काळात राबविली जाईल,असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत पुण्यात साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. ते म्हणाले,विद्यार्थ्यांचा मेंदू म्हणजे डाटा बँक नाही. सध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर अभ्यासक्रमाचे मोठे ओझे आहे. त्यातच मद्रास न्यायालयाने विद्यार्थ्यांची पुस्तकांची संख्या कमी करण्याचे आदेश दिले आहे.पहिली व दुसरीला एक व दोन पुस्तके असावेत असे या आदेशात नमूद केले आहे.त्यामुळे २०१९ व २०२० मध्ये विद्यार्थ्यांवरील अभ्यासक्रमाचा भार टप्प्या-टप्प्याने कमी झालेला दिसेल.
दहावी-बारावीमध्ये विद्यार्थ्यांना ९० टक्के गुण मिळाले तरीही पालकांचे समाधान झाल्याचे दिसत नाही. केवळ परीक्षेत मिळालेले गुण म्हणजे शिक्षण नाही,असे नमूद करून जावडेकर म्हणाले, विद्यार्थ्यांकडे शारीरिक शिक्षणासाठी वेळ नाही. विद्यार्थ्यांना आपल्या भोवतालच्या गोष्टीतूनही शिक्षण घेता आले पाहिजे. त्यामुळे अध्यापन व अध्ययन याकडे लक्ष देवून विद्यार्थ्यांना समग्र शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे असलेले सर्जनशील कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. परंतु, नवीन शिक्षण पध्दतीमध्ये याचा अंतर्भाव केला जाईल.