कासवगतीने होतेय पेट्रोल-डिझेलच्या भावात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 09:46 PM2018-06-02T21:46:45+5:302018-06-02T21:46:45+5:30
गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे.
पुणे : गेल्या महिन्यात दररोज सरासरी वीस ते तीस पैशांनी वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या भावात घट मात्र १ ते ९ पैशांदरम्यान केली जात आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढविताना मीटर धावत असून घट करताना मात्र त्याची गती निम्मी देखील नसल्याचे चित्र आहे.
गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे. शहरात एक मे रोजी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८२.३३, डिझेल ६९ आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८५.१० रुपये प्रतिलिटर इतका होता. कर्नाटक राज्याच्या निवडणुकीमुळे मे महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात जवळपास १५ दिवस पेट्रोल-डिझेलची भाववाढ करण्यात आली नव्हती.
त्यानंतर मात्र, २९ मे पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या भावात सातत्याने वाढ नोंदविण्यात आली. शहरात २९ मे रोजी पेट्रोल ८६.०७, डिझेल ७२.५१ आणि पॉवर पेट्रोलचे भाव ८८.८३ रुपये इतके होते. म्हणजेच मे महिन्यातच पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ३.७४, डिझेल ३.५१ आणि पॉवर पेट्रोल ३.७३ रुपयांनी वाढले. केवळ १५ ते १६ दिवसांतच ही भाववाढ नोंदविण्यात आली.
त्यानंतर ३० मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या भावात प्रतिलिटर १ पैशांनी घट करण्यात आली. तर, २ जून रोजी भावात प्रतिलिटरमागे ९ पैशांनी घट झाली. शनिवार अखेरीस पेट्रोलचा प्रतिलिटर भाव ८५.८४, डिझेल ७२.३० आणि पॉवर पेट्रोलचा भाव ८८.६० रुपये इतका होता.