हडपसरच्या पाण्यात कपात, हिवाळ्यामध्ये पाणीटंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 04:35 AM2017-11-27T04:35:08+5:302017-11-27T04:35:11+5:30
उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना
हडपसर : उन्हाळा सुरू होण्यासाठी वेळ असला, तरी भर हिवाळ्यात लष्कर पाणीपुरवठा विभागाकडून हडपसरला होणाºया पाणीपुरवठ्यात ४८ टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे रोज १२३ एमएलडी पाण्याची गरज असताना, प्रत्यक्षात केवळ ७६ एमएलडी पाणी मिळत आहे. परिणामी, कमीदाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे.
रामटेकडीवरील पाण्याची टाकी वारंवार शून्यपातळीला जाते. त्यामुळे लष्कर पाणीपुरवठा केंद्रातून अधिकचे पाणी पंपिंग करून, या टाकीत पाणी भरणे गरजेचे आहे.
याबाबत हडपसर, कोंढवा, मुंढवा आणि वानवडी भागांतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांनी संबंधित अधिकाºयांना सर्वेक्षण करून, दोन दिवसांत हडपसर विभागास पूर्ववत व नियमित पाणीपुरवठा करण्याचा आदेश अधिकाºयांना दिला.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, नगरसेवक वैशाली बनकर, चंचला कोद्रे, प्रशांत जगताप, बंडू गायकवाड, नंदा लोणकर, योगेश ससाणे, चंचला कोद्रे, रुक्साना इनामदार, हमिदा सुंडके, परवीन शेख, माजी नगरसेवक सुनील बनकर आदींच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. या बैठकीसाठी लष्कर पाणीपुरवठा अधिकारी, विद्युत विभागाचे अधिकारी व संबंधित विभागाचे अभियंते उपस्थित होते.
आठ दिवस पाणीपुरवठा नाही
1 हडपसर परिसरातील हिंगणेआळी, मगरआळी, रामेशीआळी, पांढरेमळा, गरडूवस्ती, अल्हाटवस्ती, काळेपडळ या भागात आठ-आठ दिवस पाणी येत नाही. हडपसर गावठाण, गाडीतळ, माळवाडी, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणेनगर, आकाशवाणी, गाडीतळ या भागात पूर्वी दोन तास पाणी येत होते. सध्या केवळ अर्धा तास पाणी येते. पाण्याची वेळ अनियमित असते.
2 परिणामी, काही भागात नगरसेवकांकडून टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र तो पुरेसा नाही. परिणामी, पैसे देऊनही सोसायट्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. रामटेकडीवर नव्याने बांधण्यात आलेली ८० लाख लिटर पाण्याची टाकी वापराविना पडून आहे. लष्कर जलशुद्धीकरण केंद्र हे १०० एमएलडीचे असून, त्याची मुदत संपली आहे. दुरवस्था झाल्याने ते कोणत्याही क्षणी बंद पडू शकते. त्यामुळे या ठिकाणी नवीन २०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी या नगरसेवकांनी केली आहे.
3 लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष पावरा म्हणाले की, लष्कर पाणीपुरवठा ते रामटेकडी टाकीदरम्यान जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होण्यास सात महिने लागतील.
पाणीपुरवठा सुरळीत न होण्याची कारणे :
पर्वती येथून लष्कर जलशुद्धीकरण केंद्रात पाणी कमी येते. नवीन जलवाहिन्या टाकणे गरजेचे. शहरातील काही भागांत चोवीस तास पाणीपुरवठा होतो.
रामटेकडी येथील पाण्याच्या टाक्याची पातळी वारंवार शून्य होते. रामटेकडीवर बांधलेल्या नवीन टाकीतून पाणी सोडण्याची आवश्यकता.
दाब कमी असल्याने उंच भागातील नळांना पाणी येत नाही.