अवैध माती वाहतूक व उत्खननाला ऊत
By Admin | Published: April 20, 2015 04:19 AM2015-04-20T04:19:48+5:302015-04-20T04:19:48+5:30
जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावातून व वाड्या-वस्त्यांमधून अवैधरीत्या माती वाहतूक व उत्खनन जोमात चालू असून,
मढ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी गावातून व वाड्या-वस्त्यांमधून अवैधरीत्या माती वाहतूक व उत्खनन जोमात चालू असून, या सर्व प्रकारास महसूल अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याची चर्चा या परिसरात आहे.
या परिसरात मढ खोऱ्यातील तळेरान, खिलेश्वर, कोल्हेवाडी, गवारवाडी, सीतेवाडी तसेच डोंगरीभागातून माती अवैधरीत्या नियम धाब्यावर बसवून काढली जाते व अवैधरीत्याच वाहतूक केली जाते. या सर्व प्रकाराकडे महसूल विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
मुळात तालुक्याचा हा पिंपळगावजोगा धरण परिसर तसेच माळशेज पट्टा इको-झोनमध्ये असल्याने येथे उत्खनन करण्यास बंदी आहे. तरीही या परिसरात जेसीबी यंत्राच्या साह्याने उत्खनन सर्रास चालू आहे. अवैध गौण खनिजाच्या लुटीमुळे मढ खोऱ्यातील आदिवासी गावातील परिसरात असलेले डोंगर, टेकड्या, जंगले, झाडेझुडपे, नामशेष होऊ लागली आहेत.
संबंधित शासकीय विभागातील काही अधिकारी आपल्या आर्थिक फायद्यासाठी अवैध उत्खनन व वाहतुकीकडे काणाडोळा करीत आहे. या परिसरातून जुन्नर, बनकरफाटा, ओतूर मार्गाने सर्रास चालू आहे, तर काही माती माफिया तुटपुंजी रॉयलटी भरून, वाहतूक परवाने काढून राजरोसपणे माती मढ खोऱ्यातील आदिवासी पट्ट्यातील गावामधून व वाड्या-वस्त्यांमधून सर्रास नेत आहे.