पुणे शहरात रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णवाहिका चालकांवरील ताण काही प्रमाणात कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 07:22 PM2021-05-16T19:22:25+5:302021-05-16T19:22:41+5:30
दिवसाला येत होते ४५० कॉल, स्मशानभूमीतील वेटिंगही झाले कमी
पुणे: कोरोनाचे रुग्ण मागील आठवड्यापासून कमी झाल्याने रुग्णवाहिका चालकांनाही उसंत मिळाली आहे. रुग्णसंख्येचा आकडा दोन हजारांच्या खाली आल्याने प्रशासनाला आणि पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. या काळात रुग्णांना नेण्या-आणण्याचे काम करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.
शहरात मार्च आणि एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत गेले. याकाळात रुग्णालयात जागा मिळणे अवघड झाले होते. अनेक रुग्णांना तर रुग्णवाहिकेत मुक्काम करावा लागला होता. या काळात डॉक्टर, नर्स, प्रशासकीय अधिकारी प्रचंड व्यस्त होते. त्यांच्यावर कामाचा ताण होता. या काळात पालिकेच्या आणि १०८ रुग्णवाहिकेच्या चालकांवरही ताण आला होता. पालिकेच्या रुग्णवाहिकेसाठी तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षामध्ये दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल येत होते. तर, १०८ ला २५० पेक्षा अधिक कॉल येत होते.
पालिकेने या काळात खासगी रुग्णवाहिकांची सेवाही घेतली होती. कोरोना रुग्णांकरिता ६९ रुग्णवाहिका, नॉन कोविडसाठी ११ यासोबतच ऑक्सिजनच्या ८०, नॉन ऑक्सिजन १५ रुग्णवाहिका सेवेत ठेवल्या आहेत. या काळात सतत फोन येत असल्याने चालकांचीही मोठी धावपळ होत असे. सतत या रुग्णालयातून त्या रुग्णालयात पळावे लागत होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून रुग्ण कमी झाल्याने कॉलचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे चालकांना थोडी उसंत मिळाली आहे.
स्मशानभूमीमध्येही अंत्यविधीसाठी मोठ्या प्रमाणावर 'वेटिंग' होते. मात्र, प्रशासनाने स्मशानभूमींची वाढविलेली संख्या आणि पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी करण्यास दिलेली परवानगी यामुळे हे वेटिंग कमी झाले आहे. तसेच विविध सामाजिक संस्था या कामात मदत करत आहेत.