स्पर्धेत विकासाचे प्रतिबिंब
By admin | Published: October 4, 2016 01:14 AM2016-10-04T01:14:53+5:302016-10-04T01:14:53+5:30
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनातून बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे काढले.
पिंपरी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनातून बदलत्या महाराष्ट्राचे प्रतिबिंब उमटले आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे काढले.
प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमीतील महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन व स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव ब्रिजेशसिंह, ज्येष्ठ छायाचित्रकार सुधारक ओलवे उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘या छायाचित्र प्रदर्शनात मांडण्यात आलेली सर्व छायाचित्रे अत्यंत सुंदर आहेत. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने चांगली संकल्पना प्रत्यक्षात आणली. राज्यात दोन वर्षांत घडलेल्या परिवर्तनाचे प्रतिबिंब या छायाचित्रांमधून उमटले आहे. एखादी गोष्ट प्रत्यक्ष बघितल्याशिवाय विश्वास बसत नाही. अशा वेळी छायाचित्रही महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असे सांगून ते पुढे म्हणाले की, छायाचित्रकला ही नैसर्गिक स्वरूपात अभिव्यक्त होण्याचे माध्यम आहे. एका फोटोतच हजार शब्दांचा आशय सामावलेला असतो. माध्यमांमध्ये छायाचित्रांशिवाय बातमीला महत्व नाही.’’
ब्रिजेशसिंह म्हणाले, ‘‘लोकांच्या नजरेतला महाराष्ट्र या छायाचित्रांच्या माध्यमातून दिसत असून, प्रत्येक छायाचित्र आपली एक वेगळी कथा आहे. दोन वर्षांतील राज्याची प्रगती आणि जनतेमधील चैतन्य, राज्याचे प्रतिमा संवर्धन या छायाचित्रांमधून होत आहे.
या सर्व छायाचित्रांचा समावेश असलेले कॉफी टेबल बुक तयार करण्यात येईल. प्रदर्शनासाठी राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे ३८०० छायाचित्रे प्राप्त झाली. दर वर्षी अशा प्रकारची स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल.’’
ओलवे म्हणाले, ‘‘छायाचित्र हे समाजाचे दस्तावेज असून, नवीन पिढीसाठी इतिहास सांगण्याचे काम ते करीत असतात. राज्य शासनाच्या योजनांचे यश या छायचित्रांमधून दिसत आहे.’’ (प्रतिनिधी)