‘पुणेरी पाट्यां’त वर्तमान घडामोडींचे प्रतिबिंब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 03:12 AM2018-06-24T03:12:14+5:302018-06-24T03:12:16+5:30
पुणेरी पाट्या यावर काय बोलावे? काय सांगावे? हा न संपणारा विषय आहे. आज पुणेकर जगाच्या पाठीवर जिथे कुठे जाऊन पोहोचला आहे
प्रकाश भोंडे
पुणेरी पाट्या यावर काय बोलावे? काय सांगावे? हा न संपणारा विषय आहे. आज पुणेकर जगाच्या पाठीवर जिथे कुठे जाऊन पोहोचला आहे, तिथे त्याला पुणेरी पाट्या म्हणजे आपल्या अस्मितेशी जोडली गेलेली भावना आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. कुणाला दुखावण्याचा हेतू नाही. केवळ चालू घडामोडींची केलेली टवाळी, थोड्या तिरकसपणाने केलेला विनोद आणि टीका यांतून विसंगती टिपली जाते. चालू घडामोडींचे प्रतिबिंब या पाट्यांमध्ये आढळते, असे मत स्वरानंद प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांनी व्यक्त केले. पुणेरी पाट्यांनिमित्त त्यांच्याशी साधलेला खास संवाद.
पुणेरी पाट्या हा मुळातच एक केवळ पुणेकरांसाठी नव्हे, तर सर्वांसाठी जागतिक पातळीवरील विषय आहे. त्यात कुठलाही विषय वर्ज्य नाही. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सांस्कृतिकता एवढेच नव्हे, तर जगाच्या राजकारणाचा मार्मिक वेध पुणेरी पाट्यांमध्ये घेतला जातो हे विशेष. पुणेरी पाट्यांना समजून घेताना पुणे शहर, त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहास बारकाईने समजून घेणे गरजेचे आहे. अनेकांचा पुणेरी पाट्यांबद्दल गैरसमज असल्याचे पाहावयास मिळते. त्यांना याविषयी आवर्जून सांगावेसे वाटते, पुणेरी पाट्या म्हणजे कुणालाही उद्देशून टीका नाही. केवळ बदलत्या काळाचा आढावा घेताना त्यातील विसंगती टिपण्याचे काम या पाट्यांमधून केले जाते. त्यामुळे आज गुगलवरदेखील ‘पुणेरी पाट्या’ असे टाकायचा अवकाश, की पुणेरी पाट्यांविषयी माहिती देणाऱ्या वेगवेगळ्या साईट आपल्यासमोर येतात. पुणेरी पाट्यांचे वैशिष्ट्य सांगायचे झाल्यास त्यात एक प्रकारचा खोचकपणा दिसून येतो. त्यात गंमतदेखील आहे. ज्या घटनेची, वर्तणुकीची, प्रवृत्तीची, परिस्थितीची पाटी लिहिली आहे त्याचा आशय नेमक्या वाचकांपर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून टोमणे, तेदेखील पुणेरी शैलीतील असतील तर त्याची बात काही औरच असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुणेरी पाट्यांमधील शब्दयोजना ही मात्र विचारपूर्वक केली जाते. अर्थात, पुणेरी पाट्यांसाठी काही वेगळी साधना असावी लागते, असे नाही. सभोवतालच्या परिस्थितीकडे थोड्याशा तिरकस नजरेने पाहण्याची कला जमली, की पुणेरी पाट्या जमतात, असे म्हणायला हरकत नाही. समाजातील उणेपण प्रकर्षाने दाखवून देण्याचा प्रयत्न पाट्यांच्या निमित्ताने केला जातो. बोचरेपणा हा आणखी एक पुणेरी पाट्यांचा महत्त्वाचा स्वभावगुण सांगता येईल. आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते कमीत कमी शब्दांत मांडायचे. त्याची मांडणी अचुकरीत्या केल्यास आणि त्या मांडणीतला आशय चपखल असल्यास त्या पाट्या रसिकांच्या पसंतीस पडतात. शहरातील सदाशिव, नारायण, शनिवार, कसबा, रविवार या पेठांमध्ये आजही वाड्याच्या बाहेर, इमारतीच्या प्रवेशद्वारावर, झाडावर, बागेत, गाडीवर यासारख्या इतर विविध ठिकाणी पुणेरी पाट्या आपले लक्ष वेधून घेतात. शेलकी टिप्पणी, दोन घटना, प्रसंग, वास्तव, स्थळ, वस्तू, स्वभावविशेष यांतील फरक प्रामुख्याने पुणेरी पाट्यांमध्ये वाचायला मिळतो. पुणे पाट्यांची लोकप्रियता ही केवळ पुण्यापुरतीच मर्यादित नाही, हे लक्षात घ्यायला हवे. त्याला प्रादेशिकतेचे बंधन नाही. यात आणखी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास, आता पुणेरी पाट्या या फक्त पुण्यातच आहेत, असे नाही. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद येथेदेखील त्या-त्या प्रादेशिक भाषेनुसार पाट्या पाहावयास मिळतात. त्यामुळे पुणेरी पाट्यांचे अनुकरण इतर ठिकाणी होते. सध्या इतर शहरांमधील पाट्या या पुणेरी पाट्यांच्या नावाने खपविण्याचा प्रकार सुरू आहे. याला अस्सल पुणेकर आपल्या तिरकस शैलीत उत्तर दिल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. म्हणून तर पुणेरी पाट्या, त्यातील कडक बाणेदारपणा याची झलक अनोखी आहे, असे म्हटल्यास अतिशोयक्ती ठरू नये. प्रत्येक शहराचे आपले असे खास वैशिष्ट्य असते. त्यातून त्याची निराळी ओळख जगासमोर येते. त्यामागे कल्पकता, सर्जनशीलता, वैचारिकता, सांस्कृ तिक, सामाजिक बंध या सर्व बाबींचा विचार गांभीर्याने केला जातो. तो केल्यामुळेच अद्याप शहरांच्या ओळखी जिवंत आहेत. पुणेरी पाट्या त्याला अपवाद नाही.