खासगी रुग्णालयांकडून राखीव खाटा वाढविण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:11 AM2021-03-23T04:11:37+5:302021-03-23T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेने बोलविलेल्या खासगी रूग्णालयांच्या बैठकीत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वाढीव खाटा (बेड) राखीव ठेवण्यास काही रूग्णालयांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेने बोलविलेल्या खासगी रूग्णालयांच्या बैठकीत कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी वाढीव खाटा (बेड) राखीव ठेवण्यास काही रूग्णालयांनी नकार दिला आहे़ यामुळे येत्या सात दिवसांत संबंधित रूग्णालयांनी स्वत:हून खाटांची संख्या वाढवावी, अन्यथा महापालिकेकडून आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत रूग्णालयातील आवश्यक खाटा ताब्यात घेण्यात येतील, असा इशारा महापालिकेने दिला आहे़
शहरातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर, सोमवारी महापालिकेने खासगी रूग्णालयांची बैठक बोलविली होती़ या बैठकीस शहरातील ४५ हून लहान मोठ्या रूग्णालयांचे प्रतिनिधी उपलब्ध होते़ या वेळी सध्या आमच्याकडे इतर आजाराचे रूग्ण आहेत, काही बेड आम्ही पहिल्यापासूनच दिले आहेत आदी कारणे देत काही रूग्णालयांनी वाढीव खाटा देण्यास नकार दिला़, तर काहींनी पुढील सात दिवसांत अन्य रूग्णांचे बेड रिक्त झाल्यावर ते कोरोनाबाधितांसाठी देऊ, अशी ग्वाही दिली आहे़
या बैठकीत ज्या खाजगी रूग्णालयांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी खाटा वाढविण्याची तयारी दाखविली आहे, त्या संख्येनुसार, शहरातील एकूण ३ हजार ७४३ उपलब्ध राखीव खाटांच्या संख्येत २ हजार १६७ ने वाढ होणार आहे़
-----------------------------
आणखी दोन रुग्णालयांशी सामंजस्य करार
पुणे महापालिकेच्या रुग्णालयांसह शहरातील सध्या पूना व दीनानाथ मंगेशकर रूग्णालयांत कोरोनाबाधितांवर महापालिकेच्या खर्चाने उपचार दिले जात आहे़ त्यात आता आणखी दोन रूग्णालयांची भर पडणार असून, महापालिकेने याबाबत सिम्बायोसिस रूग्णालय (लवळे) व पुणे कॅण्टोमेंट बोर्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयाशी सामंजस्य करार केला आहे़ यामुळे महापालिकेकडे खाजगी रूग्णालयातील आणखी ११० खाटा उपलब्ध झाल्या असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली़
----------------------