पैसे मिळताच आईचा सांभाळ करण्यास नकार; ८२ वर्षाच्या आईच्या सह्या घेऊन ४६ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 03:17 PM2022-12-06T15:17:06+5:302022-12-06T15:17:18+5:30
८२ वर्षाच्या आईची पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर
पुणे : कधीही विचारपूस न करणार्या मुलगा, सुनेला आपल्या आईला माहेरहून पैसे मिळणार हे समजल्यावर तिच्याकडे येऊन कोर्टाच्या कामाकरीता सह्या लागतात, असे खोटे सांगून ४६ लाख रुपये काढून घेतले. त्यानंतर ८२ वर्षाच्या आईची पाणी व लाईट बंद करुन तिचा सांभाळ करण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी मुंढवा येथील एका ८२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिक महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिची दोन मुले, सुना व नात अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १६ एप्रिल २०१२ ते ५ डिसेबर २०२२ दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ज्येष्ठ नागरिक आहेत. तिची मुले व सुना त्यांची विचारपूस करीत नव्हते. त्यांना माहेरकडून पैसे मिळणार आहेत, असे समजल्यावर त्यांनी फिर्यादीकडे येऊन विचारपूस करु लागले. फिर्यादी यांना कोर्टाच्या कामाकरीता सह्या लागतात, असे खोटे सांगून फिर्यादी यांच्या सह्या घेतल्या. त्यांच्या खात्यातून ४६ लाख रुपये परस्पर काढून फिर्यादीची फसवणूक केली. फिर्यादी यांची पाणी व लाईट बंद करुन त्यांचा सांभाळ करण्यास नकार देऊन मानसिक व शारीरीक त्रास दिला. त्यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला होता. तेथून तो मुंढवा पोलीस ठाण्यात आला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गाडे तपास करीत आहे.