बारे खुर्द ग्रामपंचायतीत १२ लाख ६८ हजारांचा आर्थिक अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 12:29 AM2019-02-20T00:29:21+5:302019-02-20T00:29:28+5:30
उपोषणाचा इशारा : तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांच्याविरोधात ग्रामस्थांची तक्रार
भोर : भोर तालुक्यातील बारे खुर्द ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी शासनाच्या फंडातील अंगणवाडी इमारत स्मशानभूमी, व्यासपीठ बांधणे, रस्ता करणे, तर १४ वा वित्त आयोग अशा विविध कामांत दोघांनी संगनमताने सुमारे १०३ बेअरर चेक काढून, दप्तर गायब करून व्हाऊचर मोजमापे, एम. बी. बुक नसून सुमारे १२ लाख ६८ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
याप्रकरणी तपासणी करून प्राथमिक अहवाल जिल्हा परिषदेला सादर केला असून यात तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा पंचायत समितीसमोर उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी सरपंच परशुराम खुटवड, ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ भालेराव, एकनाथ बदक, रामचंद्र नाना खुटवड व ग्रामस्थांनी आयोजित पत्रकार परिषदेत इशारा दिला आहे.
ग्रामस्थांनी सांगितले, की सन २०१३ ते २०१७ या कालावधीत सुनीता गोविंद बदक या सरपंच व अभिषेक विठ्ठल बोत्रे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. ग्रामस्थांनी १८ आॅगस्ट २०१८ रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. मात्र मागील
दोन-तीन महिन्यांत टाळाटाळ
करीत काहीच कार्यवाही झाली
नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज
मांढरे व पालकमंत्री गिरीश
बापट यांच्याकडे ग्रामस्थांनी आॅक्टोबरमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर कारवाईला वेगाने सुरुवात झाली.
बारे खुर्द ग्रामपंचायतीला २०१३ ते २०१७ कालावधीत विविध विकासकामांसाठी शासनाकडून निधी मिळाला होता. त्यात अंगणवाडी इमारतीला सहा लाख रुपये आले होते. मात्र इमारत न बांधताच परस्पर निधी खर्च केला होता.
स्मशानभूमीला ३ लाख रुपये निधी मंजूर होता. परंतु निकषाप्रमाणे काम न करताच रकमेचा अपहार केला. गौतमनगरमधील व्यासपीठासाठी ७५ हजार रुपयांचा निधी मिळाला; मात्र फरशी बसविण्यासाठी खर्च केला. रस्त्याच्या कामासाठी ३ लाख मंजूर होते; मात्र निकृष्ट काम करून अडीच लाखच खर्च केले.
सभामंडपासाठी दोन लाख ६० हजार रुपये आले होते. मात्र त्याच्या खर्चाचा तपशीलच नाही. १४ वा वित्त आयोगाचा निधी मिळाला; परंतु तो निकषाप्रमाणेखर्च केला नाही. अशी ग्रामस्थांची तक्रार आहे.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून तपासणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला असून, त्यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल.
- संतोष हराळ
गटविकास अधिकारी