सारथीवरील तक्रारींकडे महापालिका अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By admin | Published: April 26, 2016 02:11 AM2016-04-26T02:11:12+5:302016-04-26T02:11:12+5:30
सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत असताना नागरिकांच्या समस्यांकडे अधिकारी काणाडोळा करत आहेत.
पिंपरी : सारथी हेल्पलाइनवर तक्रारींचा पाऊस पडत असताना नागरिकांच्या समस्यांकडे अधिकारी काणाडोळा करत आहेत. सारथी हेल्पलाइनवरून तक्रार निवारणासाठी विलंब झाल्यास महापालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
मात्र, तक्रारींची गंभीर दखल अधिकारी घेत नाहीत, हे सारथीवरील अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आरोग्य विभागाच्या तक्रारी सर्वांत जास्त आहेत. त्यामध्येही आरोग्य ‘ब’ प्रभागाच्या सर्वांत जास्त तक्रारी आहेत. उद्यान, नागरवस्ती, वृक्षसंवर्धन, स्थापत्य ब प्रभाग, फ प्रभाग, क प्रभागाच्या सर्वांत जास्त तक्रारी प्रलंबित आहेत.
सारथीवरील तक्रारींच्या गुणांचे पालन न केल्यास ५० गुणांसाठी मेमो व ७५ गुणांसाठी कारणे दाखवा नोटीस दिली जात आहे. तसेच, १०० गुणांसाठी खात्यांतर्गत चौकशी अशा पद्धतीचे कारवाईचे स्वरूप आहे. सारथीच्या आॅनलाइन अहवालाप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. सारथीवरील कोणत्याही तक्रारींसाठी हलगर्जीपणा व निष्काळजीपणा नको आहे. असे काही झाल्यास संगणक विभागाशी संपर्क साधावा, असे आयुक्त राजीव जाधव यांनी डिसेंबर २०१५ला परिपत्रकाद्वारे सांगितले होते.
सारथी व दक्षता नियंत्रण कक्षाचे प्रशासन अधिकारी व सहायक काम पाहत होते. (प्रतिनिधी)