धनगर आरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष
By admin | Published: November 25, 2015 01:02 AM2015-11-25T01:02:05+5:302015-11-25T01:02:05+5:30
‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
राहू : ‘‘धनगर समाजाच्या आरक्षणाला शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा प्रयत्न चालवला आहे,’’ असे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले.
उंडवडी सौंदडवाडी (ता. दौंड) येथे राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमातंर्गत २५ लाख रुपये खर्चून होत असलेल्या नळपाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार होते. थोरात म्हणाले, की विधानसभा निवडणुका होताच पहिल्याच आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देणारे महादेव जानकर कुठे गायब झाले आहेत, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. तालुक्याचे आमदार विकासाच्या गप्पा मारतात. ज्यांना स्वत:च्या गावातील सोसायटी, शाळा व जीवनावश्यक पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालवता येत नाही, ते तालुक्याचा काय विकास साधणार. शेतकऱ्यांची नाडी माहिती नसलेले सत्तारूढ सरकार हे शेतकरीविरोधी धोरणाचे आहे. याप्रसंगी वैशाली नागवडे, उद्धव फुले, विकास सोनवणे, सुभाष कुदळे, दत्तात्रय तांबे, मुरलीधर जगताप, मुरलीधर भोसले, वसंत थोरात, संदीप नवंगुणे, तात्यासो ठोंबरे, किरण यादव, काळुराम नागवडे, बाबा कोळपे आदि उपस्थित होते.