पोषण आहार देऊनही बालकांची वजने वाढेनात, वजनवाढीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 01:48 AM2018-11-06T01:48:48+5:302018-11-06T01:49:07+5:30
बारामती - जुलै महिन्यात बारामती तालुक्यात ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. या बालकांच्या वजनवाढीसाठी बालग्राम विकास योजनेतून ...
बारामती - जुलै महिन्यात बारामती तालुक्यात ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. या बालकांच्या वजनवाढीसाठी बालग्राम विकास योजनेतून मागील तीन महिन्यांपासून अतिरिक्त पोषक आहार देण्यात येत आहे. सध्या ६६ बालकांपैकी १० बालके सामान्य वजनाची झाली आहेत, तर ४२ बालके मध्यम श्रेणीमध्ये आली आहेत. १४ बालकांचे वजन वाढले आहे. परंतु त्यांचा श्रेणीबदल झाला नाही. पुढील एक-दोन महिन्यांमध्ये उर्वरित बालकांचेदेखील वजन वाढेल, अशी माहिती बालविकास प्रकल्पाधिकारी मिथुनमकुमार नागमवाड यांनी दिली.
तालुक्यातून डोर्लेवाडी गावामध्ये सर्वात जास्त १५ तीव्र कमी वजनाची बालके आढळली होती. बालग्राम विकास योजनेतून बालकांना अतिरिक्त पोषक आहार देण्यात येत आहे. त्याद्वारे या बालकांना सुदृढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम बारामती तालुक्यामध्ये महिला व बालकल्याण विभागांतर्गत बालग्राम विकास योजनेच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली होती. यादरम्यान जिल्ह्यात कुपोषणाच्याबाबतीत बारामती तालुक्याचा दुसरा क्रमांक लागल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर बारामती पंचायत समितीचा
बालकल्याण विभाग तीव्र कुपोषित बालकांना सुदृढ करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. बारामती तालुक्यात अंगणवाडीतील कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त आहारसंहिता व औषधसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. महिला व बालकल्याण विभागाकडून बारामती तालुक्यातील कमी वजनाच्या बालकांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येत आहे.
बारामती तालुक्यातील ४१६ अंगणवाड्यांत जून महिन्यात अंगणवाडीसेविका व पर्यवेक्षिका यांनी केलेल्या सर्वेक्षणात उंचीनुसार तीव्र कमी वजनाची व बुटकी बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. बारामती तालुक्यात प्रकल्प एकच्या विभागात ५० कमी वजनाची बालके आहेत. प्रकल्प दोनमध्ये १६ बालके अशी एकूण ६६ तीव्र कमी वजनाची बालके आढळून आली होती.
या बालकांना अंगणवाडीतच सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर दोन तासाला वेगवेगळ्या पद्धतीने अतिरिक्त आहार देण्यात येत आहे. कमी वजनाच्या बालकांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून लोहवर्धक, कॅल्शियमयुक्त औषधे, प्रोटिन कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ वजनवाढीसाठी दिले जात आहेत. त्याचबरोबर आहारात अमायलेजयुक्त पिठाची लापशी, रवा, उपमा, खीर, शेंगदाणे, खोबऱ्याचा किस, उकडलेला बटाटा, अंडी, फळे, गूळ-शेंगदाणे,खजूर, राजगीरा लाडू, अंगणवाडीतील दोन वेळेतील आहार व घरचा आहार अशा पद्धतीने दिवसभरात बालकांना अतिरिक्त आहार दिला जात आहे. या बालकांना सुदृढ करण्यासाठी बालविकास प्रकल्प विभाग मेहनत घेत आहेत.