महावितरण पुणे परिमंडलच्या प्रादेशिक नाट्य स्पर्धेत ‘मेकअप’ प्रथम, ‘ओय लेले’ द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:32 PM2018-01-09T13:32:05+5:302018-01-09T13:34:16+5:30
महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला.
पुणे : महावितरणच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत पुणे परिमंडलाने सादर केलेल्या ‘मेकअप १९८६’ या नाटकाने सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार पटकावला. तर, कोल्हापूर परिमंडलाच्या ‘ओय लेले’ या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला. भरत नाट्य मंदिरामध्ये दोन दिवसीय नाट्य स्पर्धेचा समारोप झाला.
पुणे प्रादेशिक परिमंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पुणे परिमंडलाच्या वतीने श्रीरंग गोडबोलेलिखित ‘मेकअप १९८६’ नाटकाचे दिग्दर्शन हेमंत नगरकर यांनी केले होते. तर, अपर्णा माणकीकर, संतोष गहेरवार, विवेक शेळके, सचिन निकम, उदय लाड, प्रदीप मुजुमदार यांनी प्रमुख भूमिका पार पाडल्या. तर बारामती परिमंडलाने रामचंद्र खाटमोडे व विनोद वणवेलिखित गाभारा हे नाटक सादर केले. सरोगेट मदर या विषयावरील भाष्य करून वास्तवाची मांडणी करण्यात आली. श्रीकृष्ण वायदंडे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. कोल्हापूर परिमंडलाने दीपेश सावंतलिखित ‘ओय लेले’ ही नाट्यकृती सादर केली. राजेंद्र जाधव यांनी हे नाटक दिग्दर्शित केले होते. ‘आॅनलाईन खरेदी व विक्री’च्या वेडातून थेट नातेसंबंधांचा व्यवहार अन् त्यातील अगतिकता या विषयावर भाष्य करण्यात आले.
महावितरणचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे (पुणे), नागनाथ इरवाडकर (बारामती) व किशोर परदेशी (कोल्हापूर) यांच्या हस्ते नाट्य स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी व्यासपीठावर परीक्षक मेधा गोखले, भालचंद्र पानसे, दिलीप जोगळेकर तसेच अधीक्षक अभियंता महेंद्र दिवाकर व राजेंद्र पवार, हेमंत नगरकर यांची उपस्थिती होती. विकास निकम यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत नगरकर यांनी आभार मानले.
नाटकांच्या प्रथम व द्वितीय क्रमांकांसोबतच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार हेमंत नगरकर (पुणे) यांना मिळाला. तर, उत्कृष्ट अभिनय (स्त्री) अपर्णा माणकीकर (पुणे), अभिनय (पुरुष) विवेक शेळके (पुणे), नेपथ्य राजीव पुणेकर (पुणे), प्रकाशयोजना सुनील शिंदे (कोल्हापूर), पार्श्वसंगीत स्वप्निल काटकर (कोल्हापूर), वेशभूषा सुप्रिया पुंडले, रंगभूषा शैलजा सानप यांना प्रथम क्रमाकांचे पारितोषिक मिळाले. तर अभिनयाच्या उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी संतोष गहेरवार (पुणे), राम चव्हाण (बारामती), प्राजक्ता घाडगे (बारामती) व रेश्मा इंगोले (बारामती) यांची निवड करण्यात आली. बारामती येथे फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पुण्याचे ‘मेकअप १९८६’ हे नाटक पुणे प्रादेशिक विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. महावितरणच्याच कलावंतांनी संगीतरजनीचा कार्यक्रम सादर केला.