RTO अधिकाऱ्यांकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 05:18 PM2022-07-09T17:18:30+5:302022-07-09T17:35:33+5:30

ई मेलमध्ये राज्य घटनेविषयी अवमानकारक भाषा...

Regional transport officials arrested for demanding Rs 1 crore ransom | RTO अधिकाऱ्यांकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

RTO अधिकाऱ्यांकडे १ कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पुणे : भावाने बनावट सही करुन गाडी विकल्याच्या प्रकरणात आरटीओ अधिकाऱ्यांना त्याने आरोपी केले. ही तक्रार मागे घेण्यासाठी तुम्ही एक कोटी रुपये गोळा करुन द्या, अशी खंडणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात सरकारी अधिकाऱ्यांवरील दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी मिळावी, यासाठी त्याने सर्व अधिकाऱ्यांना ई मेल पाठविले असून त्यात राज्य घटनेबाबत अश्लील आणि अवमानकारक भाषा वापरली आहे. बंडगार्डन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सचिन काशीनाथ गव्हाणे (रा. राजगुरुनगर) असे त्याचे नाव आहे. त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० मे २०२१ ते २७ जून २०२२ दरम्यान घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सचिन गव्हाणे याचा ट्रक त्याचा भाऊ समीर याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे अर्ज करुन त्यावर सचिन याची स्वत:च सही करुन कागदपत्रे सादर केली. सचिन याची गाडी विशाल टाव्हरे याच्या नावे करुन दिली. याप्रकरणी सचिन याने भोसरी एमआयडीसी येथे फिर्याद दिली होती. त्यावरुन त्याचा भाऊ समीर व तसेच तत्त्कालीन सहायक परिवहन अधिकारी सुबोध मिर्चीकर व इतर अधिकारी, कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला गेला आहे. याप्रकरणात पोलिसांनी तपास करुन परिवहन आयुक्त मुंबई यांच्याकडे दोषारोप दाखल करण्याची परवानगी बाबत प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रलंबित आहे. याप्रकरणात सचिन याने वेगवेगळया कार्यालयामध्ये केलेल्या ई मेल व तक्रारी अर्जांमध्ये परिवहन अधिकारी व कर्मचारी विरुद्ध तक्रारी केल्या आहेत. तसेच दोषारोप दाखल करण्यास लवकर परवानगी द्यावी, यासाठी तो सातत्याने ई मेल करीत असतो. गेल्या वर्षीपासून त्याने फिर्यादी अजित शिंदे यांच्या कार्यालयात येऊन आपण अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारी बंद करण्यासाठी या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून १ कोटी रुपये घेऊन देण्यासाठी मागणी शिंदे यांच्याकडे केली.

शिंदे यांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ते यावर काही बोलत नाही, हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:च ८५ लाख रुपये एकतर्फी रक्कम निश्चित करुन ही रक्कम फिर्यादी शिंदे यांनी गोळा करुन द्यावी, अशी वारंवार मागणी केली. शिंदे यांनी त्याला नकार दिला असता त्याने "गव्हाणेला पुढे जाऊन तुमच्याविरुद्ध काय बोलायला लागेल," असे करु नका, अशी धमकी दिली.

सचिन गव्हाणे याने १ जून रोजी एक ईमेल फिर्यादी व अन्य सरकारी कार्यालयास पाठविले. त्यात त्याने राज्यघटनेबाबत अवमानकारक उल्लेख केला आहे. तसेच फिर्यादी यांच्याविषी बदनामीकारक व अश्लिल मजकूर लिहिला आहे, त्यामुळे शेवटी शिंदे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस निरीक्षक सातपुते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Regional transport officials arrested for demanding Rs 1 crore ransom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.